मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात उडणाऱ्या उपकरणांवर बंदी
By पूनम अपराज | Updated: January 5, 2021 21:15 IST2021-01-05T21:14:22+5:302021-01-05T21:15:35+5:30
Mumbai Police : या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भा. दं. वि . कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल.

मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात उडणाऱ्या उपकरणांवर बंदी
मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३१ डिसेंबर 2020 ते २९ जानेवारी २०२१ या कालावधी ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश काढण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भा. दं. वि . कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल.
२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन आणि मुंबईला दहशतवादी हल्ल्याच्या मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. शहरातील सुरक्षा व्यवस्था पाहता खबरदारीचा उपाय म्हणून गृह विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याचाच परिणाम असा आहे की, नवीन वर्षाच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांचे आधुनिकीकरण करणे, सेगवे अर्थात स्वयंचलित स्कूटर, इलेक्ट्रिक सायकली आणि सीसीटीव्ही कॅमेरे या अतिरिक्त उपयोजनांव्यतिरिक्त, सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रशासनाकडून सामाजिक उपक्रमांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५५ हजाराहून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर २५ हजाराहून अधिक आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. २१ हजार आरोपींना नोटीस बजावण्यात आली असली, तरी ८५ हून अधिक आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
शहरातील सुरक्षा यंत्रणेत कोणताही निष्काळजीपणा नाही आणि सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध प्रशासन अगदी कठोर उपाययोजना करत असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे. मुंबई पोलीस प्रवक्ते एस. चैतन्य यांनी जनतेला आवाहन केले आहे की, शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. लॉकडाउनचे कलम १८८ चे पालन करा आणि मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आजूबाजूला फिरू नका किंवा कोणत्याही प्रकारच्या उडणाऱ्या उपकरणांचा दिलेल्या कालावधीत वापर करू नका.