बदलापूर अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस
By पंकज पाटील | Updated: January 20, 2025 19:50 IST2025-01-20T19:50:31+5:302025-01-20T19:50:52+5:30
अत्याचार प्रकरणानंतर शिंदेच्या घराची तोडफोड झाल्याने बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले.

बदलापूर अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस
वडिलांनी खासगी बँकेकडून घेतले होते अडीच लाखांचे कर्ज बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी खाजगी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही जप्तीची नोटीस लावली आहे.
अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खाजगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतलं होते. मात्र अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाल्याने बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले. त्यांना कोणताही कामधंदाही नसल्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. त्यामुळेच आता या बँकेने त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस लावली आहे.
४ डिसेंबर २०२४ रोजी ही नोटीस लावण्यात आली असून नोटीस लावल्यापासून ६० दिवसात थकीत २ लाख १६ हजार रुपये रकमेचा भरणा करा, अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेले त्यांचे घर ताब्यात घेऊन जप्त केले जाईल, असा या नोटीसमध्ये उल्लेख आहे.