लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: फोर्ट परिसरातील कामगार पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या सुपरवायझरला धमकावत कंत्राटदाराच्या वडिलांचे अपहरण करत दादर येथील युनियन कार्यालयात नेत १० लाख रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अपहरण, खंडणीचा गुन्हा नोंदवत मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नवी मुंबईचे रहिवासी असलेले कंत्राटदार विजय पांडुरंग मोरे (४०) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी साडेदहा वाजता फोर्ट येथील महात्मा गांधी रोड परिसरात कंपनीत काम करणा-या १७ कामगारांनी किरकोळ कारणातून काम बंद केले होते.
आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
कामगार सेनेचे चिटणीस सुजय ठोंबरे यांच्यासह मनोहर चव्हाण, सुनील राणे, अजय शिर्के आणि रोहित जाधव तेथे आले. त्यांनी मोरे यांच्या कंपनीचा सुपरवायझर सुजित कुमार सरोज (३६) यांना धमकावत मारहाण केली. तसेच मोरे यांच्या वडिलांना जबरदस्तीने गाडीत बसवून मनसे युनियन दादर कार्यालयात नेले. तेथे तडजोड करण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली.
अखेर तक्रारदारांनी आझाद मैदान पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक दळवी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) करण सोनकवडे आणि एपीआय आनंद शहाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी लीलाधर पाटील व तडीपार विभागाचे अधिकारी रामचंद्र चांदवडे यांचे दोन पथक तयार करण्यात आले. पथकाने आरोपींची तांत्रिक विश्लेषण करून ठोंबरेसह पाच आरोपींना अटक केली.