अतुल सुभाषने आत्महत्येपूर्वी पत्नी निकिता सिंघानियावर सुसाईड नोट आणि व्हिडिओमधून गंभीर आरोप केले होते. यामध्ये त्याने दोन मिस्ट्री बॉयचा देखील उल्लेख आहे, ज्यांच्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे. आपल्या पत्नीचे दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याने व्यक्त केला आहे. एक रोहित निगम आणि दुसरा आरजे सिद्दीकी. अतुल सुभाषने म्हटलं आहे की, निकिता एका तरुणाच्या खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करायची आणि दुसऱ्याशी तासनतास फोनवर बोलत असायची.
आता निकिताने आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. रोहित निगम हा तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा असल्याचं जौनपूर न्यायालयात सांगितलं. ती म्हणाली, माझे त्याच्याशी कोणतेही चुकीचे संबंध नाहीत. तो माझ्या घरी यायचा, पण माझे त्याच्याशी कोणतेही चुकीचे संबंध नव्हते. २०२१ मध्ये माझी आई निशा सिंघानिया बंगळुरूला आली तेव्हा रोहित आम्हाला भेटायला यायचा, पण अतुल विनाकारण माझ्याशी भांडायचा. त्याने माझ्या आईसमोर मला धक्काबुक्की केली होती आणि मला मारहाण करायचा, त्यामुळे मी घर सोडलं.
अतुलचा आरोप होता की, निकिताचे रोहित निगम नावाच्या मुलासोबत संबंध होते आणि जेव्हा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला तेव्हा रोहित त्याच्या घरी खूप वेळा येऊ लागला. निकिता तासनतास रोहितशी बोलायची. दोघांमध्ये काहीतरी असल्याचा संशय त्याला आला. अतुलने आरोप केला होता की रोहित त्यांच्या नात्याच्या मध्ये आला होता आणि त्याने निकिताला बोलण्यापासून देखील थांबवलं होतं पण तिने काहीच ऐकलं नाही.
अतुल सुभाषने लखनौच्या आरजे सिद्दीकी याच्यावरही आरोप केले होते. तो म्हणाला होता की जेव्हा तो निकिताला पैसे पाठवायचा तेव्हा ती आरजे सिद्दिकीच्या खात्यात ते पैसे ट्रान्सफर करायची. निकिताने आपल्या मुलाचा वाढदिवसही सिद्दिकीच्या घरी साजरा केल्याचं अतुलने सांगितलं. पोलीस आरजे सिद्दिकीची चौकशी करत आहेत आणि सिद्दिकीच्या खात्यात ट्रान्सफरची रक्कम कशी आणि कुढे वापरली गेली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.