वसई - मुंबईतील महिला डॉक्टर नालासोपारा येथील तात्पुरत्या वास्तव्यास आली असताना रविवारी तिच्या राहत्या घरात शिरलेल्या दोन चोरांशी तिने एकाकी झुंज दिल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे रविवार दि 30 मे रोजीच्या पहाटे वेळी ही घटना घडली आहे. दरम्यान त्या महिला डॉक्टरने दाखवलेल्या धाडसामुळे चोरांचा प्रयत्न जरी फसला असला तरी यापैकी एका आरोपीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर शितल आल्हाट (३५) असे या धाडसी महिलेचे नाव आहे. ती मुंबई चेंबूरची रहिवासी आहेअधिक माहिती नुसार, मुंबई चेंबूर येथे राहणारी डॉक्टर महिला ही सध्या नालासोपारा येथील मैत्रिणीच्या घरी आली आहे. त्यांच्या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या पंधरा दिवसापूर्वी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील साई लक्ष्मी बिल्डिंग येथील मैत्रिणीच्या रिकाम्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या. तीन महिने त्या या घरात राहणार होत्या. त्यांचे पती हे कामानिमित्त बाहेरगावी असून त्यांची दोन्ही मुले ही आजोळी अहमदनगर येथे गेली होती.
रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांना अचानक आवाजाने जाग आली, त्यांच्या समोर दोन तरुण हातात सुरा घेऊन उभे होते. त्याचवेळी हॉलमधील खिडकीची काच सरकवून ते घरात शिरले होते. त्यातील एकाने डॉक्टर शीतल यांच्या तोंडात बोळा कोंबून गप्प राहण्यास सांगितले. तर दुसऱ्या चोराने त्या डॉक्टर महिलेचे हात बांधायचा प्रयत्न केला. मात्र त्या परिस्थितीतही प्रसंगावधान दाखवत त्यांनी दोन्ही चोरांना झुंज देत प्रतिकार केला. अचानकपणे घडलेल्या या झटापटीत ते दोन्ही चोर गोंधळले आणि डॉ. शीतल यांनी सर्वत्र मदतीचा धावा केला खरा मात्र या सर्व गोंधळात ते दोन्ही चोर मुख्य दारातून पळून जाण्यात यशस्वी झाले. परिणामी चोरांनी चक्क जाताना घरातून जास्त काही नाही. मात्र, डॉक्टर शीतल यांचा मोबाईल आणि 5 हजार रुपये घेऊन पोबारा केला.