भावाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:28 IST2021-01-08T01:28:26+5:302021-01-08T01:28:31+5:30

निवृत्त पोलिसाला अटक : भावजयीवरही चाकूने हल्ला, पोलिसांनी वाचविले प्राण

Attempted suicide by murdering brother | भावाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न

भावाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे :  घराचा ताबा मागणाऱ्या भावजयीवर चाकूचे वार केल्यानंतर यात मध्यस्थी करणाऱ्या अजय बाळा कर्डक (२८, रा. उल्हासनगर) या चुलत भावाचा चाकूचे वार करून खून करणाऱ्या निवृत्त पोलीस जमादार महेंद्र कर्डक (५५) याला श्रीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्याचवेळी खुनी हल्ला झालेल्या नीता कर्डक हिला तातडीने रुग्णालयात दाखल करून तिचेही प्राण वाचविले आहे.


     हवालदार राजन कर्डक यांचा २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराचा ताबा हा त्यांचा भाऊ महेंद्र यांच्याकडे होता. पतीच्या निधनानंतर आपल्या घराचा ताबा मिळविण्यासाठी नीता या महेंद्र यांच्याकडे पाठपुरावा करीत होत्या. ६ जानेवारीला रात्री किसननगर येथील विजय सदन येथील महेंद्र यांच्याकडून आपल्या घराचा ताबा घेण्यासाठी पुन्हा चुलत दीर अजय (२८) आणि अन्य एक नातेवाईक शंकर मालविया यांच्यासह गेल्या. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यातूनच महेंद्र याने घरातील सुरीने नीताच्या गळ्यावर वार केले. त्याच दरम्यान श्रीनगर पोलिसांना या भांडणाची माहिती मिळाली. हा हल्ला झाल्यानंतर बीटमार्शल मुकुंद राठोड व सुनील धोंडे तिथे पोहाेचले. त्यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत तिथून बाहेर पडलेल्या नीता यांच्या गळ्याला ओढणीने बांधून राठोड यांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. तर धोंडे यांनी हल्लेखोराचा शोध घेतला. तोपर्यंत त्याने या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या अजय यांच्यावरही चाकूने वार केले. त्यानंतर तो स्वत:वर वार करण्याची धमकी देत होता. अजय हा देखील रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

धोंडे यांनी महेंद्रच्या हातातील चाकू काढला. नंतर, स्थानिकांच्या मदतीने त्याला पोलीस ठाण्यात नेले.  अजयला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 


आयुक्तांनी केले कौतुक
पोलीस अंमलदार राठोड आणि धोंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या महिलेचे प्राण वाचविले. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीलाही अटक केल्याबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी त्यांचे कौतुक केले.

Web Title: Attempted suicide by murdering brother