Attempted rape on a friend's mother | मित्राच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न
मित्राच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न

बदलापूर : आपली मुले चांगल्या संगतीत राहावी, याकडे प्रत्येक पालकाचे लक्ष असते. मात्र, हीच गोष्ट बदलापुरात एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. मुलाच्या दारूड्या मित्राला आपल्या मुलासोबत न राहण्याची समज दिल्यानंतर त्याने मित्राच्या आईवर बलात्कार करण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.


पश्चिमेतील बॅरेज रोडवरील रमेशवाडी भागात हा प्रकार घडला. या भागातील एका गृहसंकुलात पीडित महिला कुटुंबीयांसोबत राहते. त्यांचे पती आणि मुलगा असे दोघेही सरकारी नोकरी करतात; मात्र त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या दिनेश गोल्हे नामक मुलाशी पीडित महिलेच्या मुलाची मैत्री होती; मात्र दिनेशला दारूचे व्यसन असल्याने या मैत्रीमुळे आपल्याही मुलाला नको त्या सवयी लागतील आणि तो वाया जाईल, अशी भीती या महिलेला होती. त्यामुळे त्यांनी दिनेशला आपल्या मुलासोबत राहू नको, अशी ताकीद दिली होती. त्याचा राग मनात ठेवून दिनेश १२ डिसेंबरला त्या घरी एकट्याच असताना त्यांच्या घरात घुसला. त्यानंतर, त्याने त्या महिलेला जाब विचारत त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.


महिलेने त्याला जोरदार प्रतिकार केल्यामुळे त्याने थेट चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वार चुकवण्यासाठी महिलेने हात मध्ये टाकला असता दिनेश याने त्यांच्या हातावर वार केले.
यावेळी या महिलेने आरडाओरडा केल्याने जिन्यात कचरा गोळा करत असलेल्या सफाई कामगार महिलेने सोसायटीच्या लोकांना गोळा केले; मात्र दिनेश तिथून पळून गेला. पोलिसांनी त्याला काही तासांमध्येच अटक केली.


बदलापूर पोलिसांनी काही तासांतच दिनेशला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, पीडित महिलेवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या प्रकारामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

Web Title: Attempted rape on a friend's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.