सलमान खानच्या बहिणीच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:38 IST2024-01-08T13:35:35+5:302024-01-08T13:38:21+5:30
वाजे येथे सलीम खान यांचे अर्पिता फार्म हाऊस आहे.

सलमान खानच्या बहिणीच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवीन पनवेल: अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता हिच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा दोघांनी प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजेशकुमार ओमप्रकाश गिला (रा. अबोर, पंजाब) आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सिख (रामपुरा, पंजाब) अशी नावे आहेत.
वाजे येथे सलीम खान यांचे अर्पिता फार्म हाऊस आहे. ४ जानेवारी रोजी चारच्या सुमारास दोन व्यक्ती कोणतीही परवानगी न घेता मेन गेटच्या डाव्या बाजूने असलेल्या तारा व झाडांच्या असलेल्या कंपाउंडमधून फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. सिक्युरिटीने त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी महेशकुमार रामनिवास आणि विनोदकुमार राधेश्याम असे सांगितले.
फार्म हाऊसवर येण्याचे विचारले असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांची नावे अजेशकुमार ओमप्रकाश गिला आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सिख अशी असल्याचे सांगितले.
बनावट आधार कार्ड
पोलिसांनी अजेशकुमार याच्याकडे मोबाइल तपासला असता मोबाइलमध्ये महेशकुमार रामनिवास व अजेशकुमार ओमप्रकाश गिला या दोन्ही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचे फोटो असलेले आधार कार्ड व विनोदकुमार राधेशाम व गुरुसेवकसिंग सिख या दोन्ही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचे फोटो असल्याचे दिसून आले. आधार कार्डवर असलेले फोटो त्यांचेच असल्याचे कबूल केले.