Attempt to murder in Dadar area! After breaking up the love affair, the lover attacked on his girlfriend | दादर परिसरात खळबळ! प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीवर केले सपासप वार 

दादर परिसरात खळबळ! प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीवर केले सपासप वार 

ठळक मुद्देआरोपी तेजस कमलाकर खोबरेकर (२८) याच्या विरूद्ध भा. दं. वि. कलम ३०७, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पूनम अपराज

मुंबई - दादर परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमसंबंध तोडल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तेजस कमलाकर खोबरेकर (२८) याच्या विरूद्ध भा. दं. वि. कलम ३०७, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेत प्रेयसी आणि प्रियकर दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, अशी माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

आरोपी तेजस हा दादर पश्चिम येथील आगर बाजार येथे राहत असून तो शेअर टॅक्सी चालवतो. तेजस आणि जखमी तरुणी हे एकमेकांना ओळखत असून त्याचे त्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. १३ नोव्हेंबर रोजी रात्री 11:10 वाजता आरोपीने त्याच्या प्रेयसीला आगर बाजार चंद्रकांत धुरू वाडी येथे बोलावून घेतले. प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणावरून आरोपीने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हा जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी तेजस कीर्ती कॉलेज येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

घटनास्थळी दादर पोलिसांचे पथक पोचले आणि जखमी तरुणीला केईएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता.  आरोपीच्या घरी जाऊन पोलिसांनी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. नंतर गुन्हा केल्यानंतर हा आरोपी हा किर्ती कॉलेज येथे गेल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील गांवकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाकर शेळके,  रात्रपाळी पर्यवेक्षक बापूसाहेब सांडभोर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक वाघमारे व गुन्हे प्रकटीकरण पथक पो.ह.क्र 6819/पंडित, पो.शि.050087/काळे, पो.शि 05799/शिंदे, पो.शि 08.0029/घुगे, पो.शि.09.1809/माळी, पो.शि 11.0193/बोडके व दादर 1 मोबाईलवरील पो.उ.नि.भाबड व स्टाफ व स्थानिक नाखवा (मच्छीमार) यांनी किर्ती कॉलेज, प्रभादेवी चौपाटी, नरिमन भाटनगर, वरळी कोळीवाडा या ठिकाणी नियोजनबद्ध शोधमोहिम राबवून ६ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करताना  आरोपीला थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला असता आरोपीने चाकू काढून स्व:ताच्या गळ्यावर वार करत असताना त्याला पकडून त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. जखमी तरुणीवर केईएम रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले तर आरोपी तेजसवर सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

Web Title: Attempt to murder in Dadar area! After breaking up the love affair, the lover attacked on his girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.