शिक्षिकांवर हल्ला करुन शाळेतून ५ वर्षीय मुलीला पळविले; अपहरणामागे आई ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:36 IST2019-12-25T15:32:58+5:302019-12-25T15:36:34+5:30
मुलीच्या आईने अन्य एकाच्या मदतीने मुलीस पळविले

शिक्षिकांवर हल्ला करुन शाळेतून ५ वर्षीय मुलीला पळविले; अपहरणामागे आई ?
नांदेड : शहरातील एका शाळेत शिक्षिकांवर ब्लेडने वार करुन ५ वर्षीय मुलीला पळविल्याची घटना ५ दिवसांपूर्वी घटना घडली होती़ या प्रकरणात सोमवारी रात्री अज्ञातांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
गुरुनगर येथील रहिवासी संजय वायफळकर यांची साध्वी नावाची ५ वर्षाची मुलगी आयडीयल पब्लिक स्कूलमध्ये शिकते़ नेहमीप्रमाणे १९ डिसेंबर रोजी वायफळकर यांनी साध्वीला शाळेत सोडले़ त्यानंतर ते घरी परत आले़ त्याचवेळी साध्वीची आई राजश्री व अनोळखी पुरुष शाळेत आले़ यावेळी त्यांनी साध्वीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला़ ही बाब शाळेतील कंधारे आणि साखरे या शिक्षिकांच्या लक्षात आली़ त्यांनी साध्वीची आई व त्या पुरुषाला विरोध केला़ तोच त्यांनी शिक्षिकांच्या हातावर ब्लेडने वार केला़ त्यानंतर साध्वीला घेऊन ते पळून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच संजय वायफळकर यांनी २० डिसेंबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली़
आईनेच पळविले?
आईनेच मुलीला पळविल्याची तक्रार मुलीच्या पित्याने ठाण्यात दिली आहे. ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले़ त्या तक्रारीत त्यांनी साध्वीच्या आईनेच अन्य एकाच्या मदतीने तिला पळवून नेल्याचे तसेच तिच्या जिवाला धोका असल्याचे नमूद केले होते़ पोलिसांनी या प्रकरणात तब्बल पाच दिवसांनंतर गुन्हा दाखल केला.