Karnataka Crime News: वडिलांच्या मृत्यूला आईने केलेली करणी कारणीभूत असल्याचा दावा एका ज्योतिषाने केला आणि त्या एका वाक्याने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा भयानक अंत झाला. कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात सुचित्रा नावाच्या महिलेने आपली ५५ वर्षीय आई पुष्पावती यांची निर्घृण हत्या केली आहे. अंधश्रद्धेपोटी केलेल्या या कृत्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
वडिलांच्या मृत्यूचा सूड?
आरोपी सुचित्रा ही तुमकुरु शहरात आपल्या पतीसोबत राहत होती. सुमारे १८ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचा धक्का ती सहन करू शकली नाही आणि ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. याच काळात ती एका ज्योतिषाच्या संपर्कात आली. त्या ज्योतिषाने सुचित्राला सांगितले की, तुझ्या आईने जादूटोणा केला होता, म्हणूनच तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला."
गाढ झोपेत असताना आईचा घेतला बळी
ज्योतिषाच्या सांगण्यावर सुचित्राने डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिच्या मनात आईबद्दल संताप निर्माण झाला. हाच राग मनात धरून ती आईच्या घरी गेली. रात्री आई पुष्पावती गाढ झोपेत असताना सुचित्राने उशीने त्यांचे तोंड दाबले. श्वास कोंडल्यामुळे पुष्पावती यांचा जागीच मृत्यू झाला.
नैसर्गिक मृत्यूचा बनाव अन् गावकऱ्यांचा संशय
आईची हत्या केल्यानंतर सुचित्राने हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने तातडीने अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वी पुष्पावती यांचा मृतदेह पाहताना काही स्थानिकांना आणि नातेवाईकांना संशयास्पद खुणा दिसल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना बोलवले.
पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल
अंत्यसंस्काराच्या काही वेळ आधी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सुचित्राची कसून चौकशी केली. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला. ज्योतिषाच्या सांगण्यावरून आपण आईचा बळी घेतल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
ज्योतिष आणि पतीचीही होणार चौकशी
पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून सुचित्राला अटक केली आहे. या घटनेत सुचित्राच्या पतीचा काही सहभाग होता का? याचीही चौकशी सुरू आहे. तसेच, ज्या ज्योतिषाने सुचित्राला चिथावणी दिली, त्या ज्योतिषाचा पोलीस शोध घेत असून त्याच्यावरही कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.