मध्य प्रदेशातील बहुचर्चित पोलीस स्टेशन इन्चार्ज (TI) आत्महत्या प्रकरणात छतरपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात असलेले टीआय अरविंद कुजूर यांच्या आत्महत्येप्रकरणी आशी राजा परमार आणि तिचा मित्र सोनू सिंह परमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर रिमांडवर घेतलं आहे. ६ मार्च रोजी टीआय कुजूर यांनी त्यांच्या खासगी बंगल्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली.
एडिशनल एसपी विदिता डागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल रेकॉर्डच्या तपासणीत असं दिसून आलं की, आशी राजा परमार आणि सोनू सिंह परमार यांनी टीआय अरविंद कुजूर यांना बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं. या मानसिक छळाला कंटाळून कुजूर यांनी आत्महत्या केली.
"माझ्या मुलीला खोट्या गुन्ह्यात अडकवलं"
या प्रकरणात, आशीची आई सविता परमार यांनी त्यांची मुलगी निर्दोष म्हटलं आहे. सविता म्हणाल्या की, माझ्या मुलीला खोट्या गुन्ह्यात अडकवलं, फसवलं जात आहे. टीआय अरविंद कुजूर गेल्या एक वर्षापासून आशीचा त्याच्या टीममध्ये खबरी म्हणून वापर करत होते. तिला दरमहा ३० ते ५० हजार रुपये दिले जात होते.
आईने मान्य केलं की टीआय कुजूर यांनी आशीला तिच्या वाढदिवसानिमित्त आणि इतर प्रसंगी सोन्याचे हार, अंगठ्या आणि कारसाठी पैसे दिले होते. माझ्या मुलीने कोणालाही ब्लॅकमेल केलं नाही. या प्रकरणात मुलीला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा दावाही सविता यांनी केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
६ मार्च रोजी संध्याकाळी, टीआय अरविंद कुजूर यांनी छतरपूरच्या पेपटेक टाउन परिसरातील त्यांच्या खासगी बंगल्यात त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सुरुवातीच्या पोलीस तपासात ब्लॅकमेलिंग हे आत्महत्येचं कारण मानलं गेलं. या प्रकरणात आशी आणि तिचा मित्र सोनूवर संशय आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. तपासात असंही समोर आलं की, आशी आणि सोनूने मिळून कुजूरला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.