Aryan Khan Drug Case: ड्रग पार्टीतील तो दाढीवाला माफिया कोण? नवाब मलिकांनी केलेला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 15:58 IST2021-10-28T15:57:15+5:302021-10-28T15:58:53+5:30
Nawab Malik target Kashif khan, Sameer Wankhede: दाढीवाल्या व्यक्तीला मलिक यांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया म्हटले होते. त्याच्याशी संबंध असल्याने क्रूझवर तो असूनही समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही तसेच त्याची चौकशीही केली गेली नाही, असा आरोप मलिक यांनी केला होता.

Aryan Khan Drug Case: ड्रग पार्टीतील तो दाढीवाला माफिया कोण? नवाब मलिकांनी केलेला दावा
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी काल काही मोजक्या लोकांवर कारवाई करण्यात आली, क्रूझवरील अन्य लोकांना चौकशी न करता सोडून देण्यात आल्याचा आरोप केला होता. याचवेळी त्या क्रूझवर एक दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर आपल्या प्रेयसीसोबत नाचत होता, तो एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मित्र असल्याचा दावा त्यांनी केला होता. हा दाढीवाला कोण होता, त्याचा खुलासा मलिक यांनी आज केला आहे.
मलिक यांनी आज फॅशन टीव्ही इंडियाचा एमडी काशिफ खान (Kashif khan) याचे नाव घेतले. या काशिफ खानवर देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत, त्या काशिफ खानची दाढी कोणाला दिवस नाहीय का? असा सवाल मलिक यांनी केला आहे. मलिक यांना अप्रत्यक्षरित्या कालचा तो दाढीवाला म्हणजे काशिफ खान असल्याचे म्हणायचे होते. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.
दाढीवाल्या व्यक्तीला मलिक यांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया म्हटले होते. त्याच्याशी संबंध असल्याने क्रूझवर तो असूनही समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही तसेच त्याची चौकशीही केली गेली नाही. या क्रूझवरील पार्टीबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. एनसीबी काशिफ खानवर कारवाई का करत नाहीय, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.
या ड्रग माफियाच्या गर्लफ्रेंडकडे पिस्तूल देखील होती. तो एकेकाळी तिहार जेलमध्ये होता. समीर वानखेडेंनी त्याच्यावर कारवाई केली नाही आणि त्याला जाऊ दिले. अन्य लोकांना अटक केल्याचा आरोप मलिक यांनी केला. समीर वानखेडेंनी त्याच्या नाचण्याचे सीसीटीव्ही फुटेज दिले नाही तर आम्ही ते देऊ. एनसीबीला आता हा दाढीवाला कोण होता हे सांगावे लागेल. कोणत्या देशाचा आहे ते देखील सांगावे लागेल. जर त्याला या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही तर आम्हाला वाटेल की पूर्ण एनसीबीच भ्रष्ट आहे, असेही मलिक म्हणाले होते.