Aryan Khan: ड्रग्स केसमध्ये आर्यन खानला क्लीन चिट दिल्याचे वृत्त एनसीबीने फेटाळले, तपासाबाबत दिली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:56 IST2022-03-02T15:55:41+5:302022-03-02T15:56:16+5:30
Aryan Khan News: एसआयटीच्या तपासात आर्यन खानविरोधात कुठलाही सबळ पुरावा सापडला नाही, असा दावा आज एनसीबीच्या एसआयटीच्या हवाल्याने करण्यात आला होता. मात्र एनसीबीने आता हे वृत्त फेटाळून लावले आहे

Aryan Khan: ड्रग्स केसमध्ये आर्यन खानला क्लीन चिट दिल्याचे वृत्त एनसीबीने फेटाळले, तपासाबाबत दिली अशी माहिती
मुंबई - मुंबईतील आलिशान क्रूझवर सुरू पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली होती. या कारवाईवरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर एनसीबीकडून तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, या तपासात आर्यन खानविरोधात कुठलाही सबळ पुरावा सापडला नाही. तसेच ड्रग्सच्या मोठा कटाचा किंवा सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा एसआयटीला आढळला नाही, असा दावा आज एनसीबीच्या एसआयटीच्या हवाल्याने करण्यात आला होता. मात्र या संबंधी प्रसारित होत असलेल्या वृत्तांवर एनसीबीने स्पष्टीकरण दिले आहे.
एसआयटीचे प्रमुख संजय सिंह यांनी आर्यन खानविरोधात पुरावे सापडले नसल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आर्यन खानविरोधात पुरावे सापडले नसल्याचे वृत्त खरे नाही. ही केवळ अफवा आहे बाकी काही नाही. ही माहिती एनसीबीसोबत क्रॉस चेक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आतातरी याबाबत काहीच सांगता येणार नाही.
दरम्यान, आर्यन खान हा ड्रग्सच्या मोठा कटाचा किंवा सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा एसआयटीला आढळला नाही. या चौकशीत आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन चॅट तपासण्याची गरज नव्हती. चॅटमधूनही तो आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिडिंकेटचा भाग असल्याचं सिद्ध होत नाही. त्याचसोबत एनसीबीच्या नियमानुसार छापा टाकताना व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्स सिंगल रिकव्हरी म्हणून नोंदवले होते असं एसआयटीच्या चौकशीतून समोर आल्याचा दावा करण्यात आला होता.