Aryan Khan Drug Case Bail: आर्यन खानची घरवापसी; २८ दिवसांनी कारागृहाबाहेर, ‘मन्नत’वर फटाक्यांची आतषबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 08:01 IST2021-10-31T07:58:30+5:302021-10-31T08:01:01+5:30
Aryan Khan Drug Case Bail: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी आर्यनला अटक केली. गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला. जामिनाची प्रत कारागृहात वेळेवर न पोहोचल्याने शुक्रवारची रात्रही त्याला कारागृहातच काढावी लागली.

Aryan Khan Drug Case Bail: आर्यन खानची घरवापसी; २८ दिवसांनी कारागृहाबाहेर, ‘मन्नत’वर फटाक्यांची आतषबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन २८ दिवसांनी शनिवारी आर्थर रोड कारागृहाबाहेर आला. आर्यन ‘मन्नत’वर पोहोचताच तेथेही फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.
क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी आर्यनला अटक केली. गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला. जामिनाची प्रत कारागृहात वेळेवर न पोहोचल्याने शुक्रवारची रात्रही त्याला कारागृहातच काढावी लागली. शनिवारी पहाटे कारागृह प्रशासनाने जामीन पत्रपेटी उघडली. त्यानंतर सकाळी ११ वाजता आर्यन कारागृहातून बाहेर पडला. आर्यन कारागृहाबाहेर येताच शाहरूखची कार त्याला घेण्यासाठी पुढे आली. तेथून पोलिसांच्या बंदोबस्तात गाडी ‘मन्नत’च्या दिशेने रवाना झाली. यावेळी चाहत्यांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. चाहत्यांनी ‘मन्नत’बाहेरही गर्दी केली होती.
साईल, गोसावीच्या जबाबाविनाच समिती दिल्लीला
आर्यन खानवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबईला आलेली उच्चस्तरीय चौकशी समिती शनिवारी दिल्लीला रवाना झाली. एनसीबीवर आरोप करणारे पंच प्रभाकर साईल व वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी यांची चौकशी न करताच ते माघारी परतले. ही समिती अहवाल एनसीबीचे महासंचालक एस. बी. प्रधान यांच्याकडे सुपुर्द करणार आहे.
चौकशी समितीने मुंबईत बुधवारी समीर वानखेडे यांच्याकडे सुमारे साडेचार तास चौकशी करून जबाब नोंदविला. मात्र फरारी गोसावीला पुणे पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतल्याने त्याचा जबाब समितीला घेता आला नाही, तर साईलला कायदेशीर पद्धतीने समन्स न बजावल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. त्यामुळे तो जबाब नोंदविण्यासाठी हजर झाला नसल्याचे सांगितले.
विशेष न्यायालयाकडून नऊ आरोपींना जामीन
विशेष एनडीपीएस कोर्टाने शनिवारी एकूण नऊ जणांना जामीन दिला. त्यात, आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांना ड्रग्ज पुरविण्याचा आरोप असलेल्या अर्चित कुमारचाही समावेश आहे. त्याच्यासह, एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी गोमित चोप्रा, नूपुर सतिजा, समीर सहगल, गोपाळजी आनंद, मानव सिंघल, भास्कर अरोरा, इश्मित सिंग चढ्ढा, श्रेयस नायर यांनाही जामीन देण्यात आला.
आतापर्यंत एकूण २० आरोपींपैकी १४ जणांना जामीन मंजूर झाला आहे. विक्रांत छोकर, मोहक जस्वाल, अब्दुल कादीर शेख, शिवराज हरिजन आणि दोन नायजेरियन नागरिक अजूनही अटकेत आहेत.