प्रेमासाठी बांगलादेशीला बनवले ‘पाटलीण बाई’; नावानेच केला उलगडा अन् प्रियकराची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:04 IST2025-02-13T10:04:27+5:302025-02-13T10:04:48+5:30

अश्लील  फोटो पाठवून भारतीय मुलांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या  रिया बर्डे या मूळच्या बांगलादेशी तरुणीला हिललाइन पोलिसांनी सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली.

Arvind Barde, who fell in love with a Bangladeshi woman arrested by Thane Police | प्रेमासाठी बांगलादेशीला बनवले ‘पाटलीण बाई’; नावानेच केला उलगडा अन् प्रियकराची...

प्रेमासाठी बांगलादेशीला बनवले ‘पाटलीण बाई’; नावानेच केला उलगडा अन् प्रियकराची...

जितेंद्र कालेकर

ठाणे - बांगलादेशी महिलेच्या प्रेमात पडलेल्या अरविंद बर्डे याने तिला भारतीय करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधी पश्चिम बंगालमधील शाळेचे आणि ग्रामपंचायतीचे दाखले मिळवून दिले. ते देताना तिला चक्क अंजली राजाराम पाटील हे नाव दिले. पुढे तिच्याशी लग्न करून तिला अंजली बर्डे करणाऱ्या अरविंदला अखेर ठाणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने मुंबई विमानतळावर बेड्या ठोकल्या. तीन मुलांसह भारतात छुप्या मार्गाने आलेल्या अंजलीचा मुलांसह त्याने  स्वीकार केला. त्यांचीही त्याने भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे तयार केल्याचे चौकशीत उघड झाले.

अश्लील  फोटो पाठवून भारतीय मुलांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या  रिया बर्डे या मूळच्या बांगलादेशी तरुणीला हिललाइन पोलिसांनी सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली. तिच्याच चौकशीमध्ये तिची आई अंजली, बहीण रितू आणि भाऊ रवींद्र यांच्यासह बांगलादेशातून चौघे भारतात बेकायदा आल्याची बाब उघड झाली. रियाला अंबरनाथच्या नेवाळी फाटा येथील अरविंदनेच बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी मदत केली. बांगलादेशी असलेल्या तिच्या आईशी त्याने २०१३ मध्ये लग्नही केले. बांगलादेशातून आलेल्या अंजली आणि तिच्या मुलांना प. बंगालमधून भारतीय नागरिक असल्याचे शाळेचे दाखले, जन्माचा दाखला देत अंजली राजाराम पाटील या नावाने कागदपत्रेही तयार केली. प. बंगालमध्ये अंजली राजाराम पाटील हे नाव कसे आले? त्यानंतर एकदम अंजली बर्डे असे नाव कोणत्या कागदपत्रांच्या आधारे झाले? या सर्वच चौकशीतून अरविंदनेच बनावट कागदपत्रे तयार करून अंबरनाथ येथे बेकायदा वास्तव्यासाठी त्यांना मदत केल्याचे उघडकीस आले.  

अरविंद, अंजलीविरुद्ध लूक आउट नोटीस
या सर्वच चौकशीतून अरविंद यानेच बनावट कागदपत्रे तयार करून अंबरनाथ येथे बेकायदा वास्तव्यासाठी त्यांना  मदत केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी अरविंद आणि अंजली यांच्याविरुद्ध लूक आउट नोटीस जारी केली. त्याच आधारे नेपाळमधून भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई विमानतळावर ३१ जानेवारी रोजी  पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्या  पथकाने त्याला अटक केली.

...अशी तयार केली बनावट कागदपत्रे
नेवाळी भागात अरविंदची २००० मध्ये या बांगलादेशी महिलेशी ओळख झाली. तिच्या प्रेमात पडलेल्या अरविंदने तिला आधी प. बंगालची कागदपत्रे तयार करून दिली. तिच्याशी लग्न केल्यावर अमरावतीच्या अचलपूर येथून जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच नागपूर  रिजनकडून चक्क पासपोर्टही मिळवून दिला. तिच्या अनुक्रमे २३ व २१ वर्षीय दोन मुली आणि १९ वर्षीय एक मुलगा यांना नवी मुंबईच्या नेरूळमधील एका शाळेत प्रवेशही मिळवून दिला.
पुढे अंजलीची मुलगी रियाला पकडल्यानंतर या प्रेमप्रकरणातून घडलेल्या बनावट कागदपत्रांच्या अंजली पाटील ऊर्फ बर्डे प्रकरणाचा पर्दाफाश झाला. रियाला अटक झाल्यानंतर अरविंद आणि अंजली यांनी मात्र कतार देशात पलायन केले होते.

Web Title: Arvind Barde, who fell in love with a Bangladeshi woman arrested by Thane Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.