पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये चार वर्षांपासून फरारी असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या आणखी एका कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केलेल्या कारवाईत अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव तुषार जीवन जोगदंड असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे २०१४ ला रावेत येथील हॉटेल शिवनेरी येथे जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून हॉटेलचे व्यवस्थापक विशाल दत्तोबा शिंदे यांचा २३ मे २०१४ ला पिस्तुलातून गोळ्या झाडून खून झाला होता. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, कुणाल लांडगे, नरेंद्र भोईर, विशाल टिंगरे, साई ऊर्फ कौशल विश्वकर्मा, बापू ऊर्फ प्रदीप गाढवे, संतोष ऊर्फ रूपेश पाटील, राहुल करंजकर यांना अटक करण्यात आली होती. मात्र, तुषार जोगदंड गुन्हा घडल्यापासून फरार होता. दरम्यान, जोगदंड हा बुधवारी दिघी येथील रोडे हॉस्पिटलशेजारील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घराजवळ सापळा रचून जोगदंड याला ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, सचिन अहिवळे, सचिन उगले, प्रवीण पाटील, गणेश सावंत यांच्या पथकाने केली. दुसऱ्या एका कारवाईत तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडाविरोधी पथकाने पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मिलिंदनगर तसेच तपोवन मंदिर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. अक्षय चंद्रकांत भोरे (वय २३, रा. सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत, नवएकता हौसिंग सोसायटी, जे बिल्डिंग, पिंपरी), कपिल संजय गायकवाड (वय २२, रा. सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत, कपिल वास्तु हौ. सोसायटी, सी बिल्डिंग, पिंपरी), सिद्धार्थ ऊर्फ मामू गणेश यादव (वय २३, रा. बलदेवनगर, साई चौक, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मिलिंदनगर तसेच तपोवन मंदिर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून अक्षय भोरे यास मिलिंदनगर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर कपिल गायकवाड व सिद्धार्थ जाधव यांना तपोवन मंदिर परिसरातील एसबीआय बँकेसमोरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.या आरोपींवर पिंपरी ठाण्यामध्ये हाणामारी व जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून, सिद्धार्थ यादव याने फरारी कालावधीत जबरी चोरीचा गुन्हा केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, शरिफ मुलाणी, आशिष बनकर, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, प्रवीण माने, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.
पिंपरी परिसरातून दोन वेगवेगळ्या खुनांच्या गुन्ह्यातील ४ फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 19:51 IST
पिंपरी परिसरात पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत अनेक वर्षांपासून खुनांच्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक केली आहे
पिंपरी परिसरातून दोन वेगवेगळ्या खुनांच्या गुन्ह्यातील ४ फरार आरोपी जेरबंद
ठळक मुद्देरेकॉर्डवरील गुन्हेगार : खंडणी, दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई