गलांडेला अटक करा, भीमशक्तीचे रास्तारोको; मोक्काअंतर्गत कारवाईची मागणी
By शिवाजी पवार | Updated: September 21, 2023 15:28 IST2023-09-21T15:28:31+5:302023-09-21T15:28:39+5:30
याप्रकरणी सात जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.

गलांडेला अटक करा, भीमशक्तीचे रास्तारोको; मोक्काअंतर्गत कारवाईची मागणी
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांच्या अमानुष मारहाण प्रकरणातील फरार आरोपी नाना गलांडे याच्या अटकेच्या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेने श्रीरामपूर नेवासे मार्गावर रस्तारोको केला. राज्यभर गाजलेल्या या घटनेत तरुणांना झाडाला उलटे टांगून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सात जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.
सहा जण अटकेत आहेत. नाना गलांडे हा मात्र घटनेनंतर २५ दिवस उलटूनही फरार आहे. भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रास्तारोको करण्यात आला. मुख्य सूत्रधार आरोपी नाना गलांडे याच्यापर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत. सहा आरोपी दोन दिवसात पकडण्यात यश येते. मात्र नाना गलांडे अद्यापही मोकाट कसा असा सवाल मगर यांनी यावेळी उपस्थित केला.
आरोपी गलांडे हा अटकपूर्व जामिनासाठी वकीलपत्रावर सह्या करून जातो. मात्र पोलिसांना त्याचा पत्ता पत्ता लागत नाही. गलांडे याला जामीन झाला तर तो पीडित कुटुंबावर व फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्याची हरेगावमध्ये दहशत आहे. अनेकांच्या जमिनी त्याने बळकावल्या आहेत. त्यामुळे मोक्का अंतर्गत कारवाई करावी, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, विशेष सरकारी वकील देण्यात यावा, पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या. आरोपीच्या लवकरात लवकर अटकेचे आश्वासन पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.