धावत्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; ८ आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 06:14 IST2022-12-08T06:14:35+5:302022-12-08T06:14:55+5:30

१५ प्रवाशांना लुटले: दाेन अल्पवयीन मुलांसह आठ जण ताब्यात, कसारा स्थानक सोडल्यानंतर आठ तरुण एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-१ आणि एस-२ मध्ये शिरले. हे सर्व तरुण नशेत दंग होते. त्यांनी डब्यात गोंधळ घालायला सुरुवात केली.

Armed robbers pounce on speeding Devagiri Express; 8 accused in custody | धावत्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; ८ आरोपी अटकेत

धावत्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; ८ आरोपी अटकेत

कल्याण : नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आठ ते दहा दरोडेखोरांनी चाकू आणि ब्लेडचा धाक दाखवत दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. रेल्वे प्रवाशांनी रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती देताच कल्याण रेल्वे पोलिसांनी तत्काळ कल्याण रेल्वेस्थानकावर सापळा रचून आठ दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. त्यामध्ये दाेन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे रोहित जाधव, विलास लांडगे, कपिल ऊर्फ प्रकाश निकम, करण वाहने, राहुल राठोड, नीलेश चव्हाण अशी आहेत. दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्थानक सोडल्यानंतर आठ तरुण एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-१ आणि एस-२ मध्ये शिरले. हे सर्व तरुण नशेत दंग होते. त्यांनी डब्यात गोंधळ घालायला सुरुवात केली.

प्रवाशांनी दाखविले धाडस
या तरुणांनी धारदार शस्त्र दाखवत प्रवाशांच्या वस्तू आणि पैसे हिसकावून घेतले. ज्या प्रवाशांनी विरोध केला त्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार धावत्या एक्स्प्रेसमध्ये जवळपास एक तास सुरू होता. काही धाडसी प्रवाशांनी कल्याण रेल्वे नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. कल्याण रेल्वे पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक स्थानकात पोहोचले. ही गाडी फक्त दोन ते तीन मिनिटे कल्याण स्थानकावर थांबते. या कालावधीत रेल्वे पोलिसांनी लूट करणाऱ्या सहा तरुणांना ताब्यात घेतले. 

सर्व आरोपी औरंगाबादचे
एक्स्प्रेस ठाण्याच्या दिशेने रवाना झाली, तेव्हा कल्याण रेल्वे पोलिस ट्रेनमध्ये होते. इतर आरोपींना ठाणे आणि दादरपर्यंत ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. या सर्व आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून, औरंगाबादचे रहिवासी आहेत. त्यांनी आतापर्यंत किती गुन्हे केले आहेत, याचा तपास सुरू आहे.

Web Title: Armed robbers pounce on speeding Devagiri Express; 8 accused in custody