लग्नात नाचण्यावरून वाद, एसयूव्हीतून तरुणाचे अपहरण करत मारहाण
By योगेश पांडे | Updated: March 5, 2024 23:26 IST2024-03-05T23:26:33+5:302024-03-05T23:26:46+5:30
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

लग्नात नाचण्यावरून वाद, एसयूव्हीतून तरुणाचे अपहरण करत मारहाण
नागपूर : लग्नात नाचण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून चार आरोपींनी एका तरुणाचे अपहरण करत त्याला बेदम मारहाण केली. त्यांनी त्याला जखमी अवस्थेत गाडीतून फेकून दिले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
करण दीपक कुऱ्हे (२५, चिंतामणी नगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. तो पेटिंगची कामे करतो. त्याच्या मित्राचे ३ मार्च रोजी निलगिरी लॉन येथे लग्न होते. लग्नात बॅंड वाजत असताना काही तरुणांचा वाद झाला. त्यातून हाणामारीदेखील झाली. करण त्या वादापासून दूरच होता. मात्र त्याच्या मित्राला मारले जात असताना त्याने मध्यस्थी केली होती. जेवण झाल्यावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास तो लॉनबाहेर उभा होता. त्यावेळी एमएच ४८ एसी ६१६२ या क्रमांकाची एसयूव्ही त्याच्याजवळ येऊन थांबली व आतील तरुणांनी त्याला आत ओढले. त्यांनी करणचे तोंड दाबून त्याला बेदम मारहाण केली.
आरोपींनी त्याच्या पोट, पाठ व हातावर जोरदार प्रहार केले. त्यानंतर ते त्याला वेळाझरी परिसरात घेऊन गेले. तेथे मारहाण करून त्याला गाडीतून फेकून दिले. तेथून तो कसाबसा चालत सह्याद्री लॉनजवळ आला. परिसरातील लोकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्याला मेडिकल इस्पिळात दाखल करण्यात आले. त्याला गाडीचा क्रमांकदेखील माहिती नव्हता. मात्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी गाडीचा क्रमांक व आरोपींना शोधले. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील आरोपी प्रथमेष विठ्ठलराव वानखेडे (२१), मनिष सुधाकर येलेवार (२४) व चेतन संजयराव कांबळे (२३) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. तर त्यांचा चौथा साथीदार फरार आहे.