कटनी - चालत्या ट्रेनमधून अचानक गायब झालेल्या अर्चना तिवारी बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. १३ दिवसांनी या युवतीने कुटुंबासोबत फोनवर संवाद साधल्याचा दावा करण्यात आला आहे. ती सुरक्षित आहे असं तिने आईला सांगितल्याची माहिती तिचा भाऊ दिव्यांश मिश्राने दिली आहे.
दिव्यांश मिश्राने सांगितले की, मी जिथे आहे तिथे सुरक्षित असल्याचं अर्चनाने सांगितले आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा रेल्वे पोलिसांकडून करण्यात येईल. आज सकाळीच अर्चनाचे तिच्या कुटुंबासोबत बोलणे झाले. तिने सध्या ती सुरक्षित असल्याचे कुटुंबाला सांगितले. अर्चनाशी फोनवर बोलल्यापासून कुटुंबानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. परंतु अर्चना इतके दिवस कुठे होती याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झाले नाही.
अर्चना तिवारी ग्वाल्हेरमध्ये असल्याचा पुरावा सापडला होता. तिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. त्यातच राम तोमर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. राम तोमर यानेच अर्चनाचं इंदूर ते ग्वाल्हेर ट्रेन तिकिट काढून दिले होते. अर्चना बऱ्याच दिवसापासून राम तोमरच्या संपर्कात होती. राम तोमर ग्वाल्हेरच्या भंवरपुरा पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल आहे. कॉल रेकॉर्डनुसार या दोघांमध्ये खूपदा बोलणे व्हायचे. पोलिसांनी राम तोमरचा मोबाईल जप्त केला आहे. अर्चना तिवारी बेपत्ता होण्यामागे राम तोमरची भूमिका असू शकते असा संशय पोलिसांना आहे.
काय आहे प्रकरण?
७ ऑगस्टला अर्चना तिवारी इंदूरहून कटनीसाठी नर्मदा एक्सप्रेस ट्रेनने निघाली होती. मात्र वाटेतच ती रहस्यमयरित्या गायब झाली. मागील १३ दिवसांपासून अर्चना तिवारीचा शोध घेत आहेत. त्यातच आज सकाळी अर्चनाचे तिच्या आईसोबत फोनवर बोलणे झाले. ती सुखरुप असल्याचे तिने सांगितले. अर्चना तिवारी गायब झाल्यापासून ५ थेअरी समोर येत होत्या. त्यात तिने जीवाचं बरे वाईट केले असावे, तिचा अपघात घडला असावा, ती स्वत:च पळून गेली असावी यासारख्या विविध अँगलने पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.