परमबीर सिंगांविरुद्ध खंडणी वसुलीची आणखी एक तक्रार; लवकरच एफआयआर दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 09:46 AM2021-07-30T09:46:38+5:302021-07-30T09:52:37+5:30

प्रदीप शर्मा यांच्यावरही आरोप : खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकल्याचा दावा

Another complaint of ransom recovery against Parambir Singh; An FIR will be filed soon | परमबीर सिंगांविरुद्ध खंडणी वसुलीची आणखी एक तक्रार; लवकरच एफआयआर दाखल होणार

परमबीर सिंगांविरुद्ध खंडणी वसुलीची आणखी एक तक्रार; लवकरच एफआयआर दाखल होणार

Next
ठळक मुद्देकाही अधिकाऱ्यांनी धमक्या देऊन तब्बल साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोपइतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तर केतन तन्ना या आपल्या मित्राकडूनही एक कोटी २५ लाख रुपये वसुलीकाच आठवड्यात सिंग यांच्याविरुद्ध ही दुसरी तर आतापर्यंत ठाण्यातील ही तिसरी तक्रार

ठाणे : ठाणे आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त तसेच गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग आणि ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध क्रिकेट बुकी सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी करोडोंच्या खंडणी वसुलीची तक्रार गुरुवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. एकाच आठवड्यात सिंग यांच्याविरुद्ध ही दुसरी तर आतापर्यंत ठाण्यातील ही तिसरी तक्रार आहे.

ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त सिंग यांच्याच आदेशावरून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी धमक्या देऊन तब्बल साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनूने केला आहे. इतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तर केतन तन्ना या आपल्या मित्राकडूनही एक कोटी २५ लाख रुपये वसुली केल्याचे त्याने म्हटले आहे. परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्याच पथकातील तत्कालीन निरीक्षक राजकुमार कोथमिरे तसेच इतर काही अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकल्याचा आरोपही त्याने केला आहे. काही खासगी व्यक्ती आणि कुख्यात गुंड हे पोलिसांचे एजंट म्हणूनही वसुली करीत होते, असाही आरोप त्याने केला आहे. 

दरम्यान, सिंग यांच्याविरुद्ध ठाण्यात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले असून ही तिसरी तक्रार दाखल झाली आहे. याआधी कल्याणच्या बाजारपेठ आणि ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यातही खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात मात्र, एका पोलीस निरीक्षकानेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लवकरच एफआयआर होणार दाखल 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आपण तक्रार केली होती. त्याचीच राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने शहानिशा केली. गेल्या तीन महिन्यांपासून आपण हे आरोप केल्यानंतर आता ठाणेनगर पोलिसांकडून जबाब नोंदविले जात असून लवकरच एफआयआरदेखील दाखल होणार असल्याचा दावा सोनू जालान याने केला.

सोनू जालान या बुकीने केलेल्या तक्रारीवरून त्याचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
- अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

 

Web Title: Another complaint of ransom recovery against Parambir Singh; An FIR will be filed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app