स्वत:ची मुलगी पहिली यावी म्हणून नेत्यानं टॉपरला शाळेतून काढलं; निराश विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 13:29 IST2022-03-25T13:27:51+5:302022-03-25T13:29:23+5:30
नेता सत्ताधारी पक्षाचा असल्यानं पाठिशी घातलं जात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

स्वत:ची मुलगी पहिली यावी म्हणून नेत्यानं टॉपरला शाळेतून काढलं; निराश विद्यार्थिनीची आत्महत्या
चित्तूर: आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये दहावीत शिकत असलेल्या एका हुशार विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी तिनं आई वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहिली. आत्महत्येमागचं कारण तिनं चिठ्ठीत नमूद केलं.
चित्तूरच्या पालमनेरमध्ये वास्तव्यास असलेल्या मिस्बाह फातिमाचे वडील सोडा विकून उदरनिर्वाह करतात. फातिमा गंगावरम इथल्या ब्रह्मर्षी शाळेत शिकत होती. फातिमानं आत्महत्येपूर्वी आई वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून त्यांची माफी मागितली. 'माझ्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळा प्रशासनावर दबाव आणून मला काढून टाकलं. त्यांची मुलगी प्रथम यावी म्हणून त्यांनी हे केलं. त्यानंतर मुख्याध्यापकांनी कोणतंही कारण न देता मला निलंबित केलं. त्यामुळी मी निराश आहे,' असं फातिमानं चिठ्ठीत लिहिलं होतं.
फातिमाच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस अतिशय धीम्या गतीनं तपास करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. आरोप सत्ताधारी पक्षाचा नेता असल्यानं त्याला पाठिशी घालत असल्याचा दावा त्यांनी केला. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा लोकेश यांनी मिस्बाह फातिमाच्या आत्महत्येसाठी वायएसआर काँग्रेसचे नेते सुनील यांना जबाबदार धरलं आहे.
मिस्बाहला वायएसआरचे नेते सुनील यांच्या मुलीपेक्षा अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे मिस्बाहला त्रास दिला जात होता. तिला सातत्यानं धमक्या दिल्या जात होत्या. खुद्द मुख्याध्यापकच तिला धमकावत होते. त्यामुळे मिस्बाहनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप लोकेश यांनी केला.