माझे लग्न का करून देत नाही, म्हणत बहिणीवर विळेने वार; सोलापूरमधील धक्कादायक घटना
By रूपेश हेळवे | Updated: September 25, 2022 16:10 IST2022-09-25T16:10:12+5:302022-09-25T16:10:23+5:30
समीर शेख असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

माझे लग्न का करून देत नाही, म्हणत बहिणीवर विळेने वार; सोलापूरमधील धक्कादायक घटना
सोलापूर : माझे लग्न का करून देत नाही? असे म्हणत मुलाने वडिलांना शिवीगाळ करत असताना बहीण मध्यस्थी करत होती. यावेळी भावाने तिला ही शिवीगाळ करत तिच्या डोक्यात फळभाज्या कापण्याच्या विळीने वार करून जखमी केल्याप्रमाणे भावावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. समीर शेख असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत शबाना रफिक हेब्बाळ ( वय ४०, रा. किसान संकुल, जुना विडी घरकुल ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शबाना हे गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या. त्यावेळी फिर्यादीचे वडील आणि त्याचे इतर कुटुंबीय घरात बसलेले असताना आरोपी समीर शेख याने माझे लग्न का करून देत नाही असे म्हणत वडिलांना शिवीगाळ करू लागला. त्यामुळे शबाना यांनी मध्यस्ती करत शिवीगाळ करू नको असे म्हटले. त्यामुळे फिर्यादीलाही शिवीगाळ करू लागला.
शिवाय लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. यामुळे वडील व दुसरी बहीण भांडण सोडवण्यासाठी आल्यानंतर त्यांना देखील मारहाण करत शिवीगाळ करत दमदाटी केली. यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला किचनमधून बाहेर काढत असताना आरोपीने फळभाज्या कापण्याची विळीने शबाना यांच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले. याबाबत शबाना यांच्या फिर्यादीवरून समीर शेख याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक कांबळे करत आहेत.