अमृतसरच्या तरुणाचा मित्रांनीची चिरला गळा; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 16:18 IST2022-10-29T16:17:05+5:302022-10-29T16:18:02+5:30
खंडवा मार्गावरील यार्डात कॉर्ड लाईनवर गुरूवारी सकाळी दहा वाजेपूर्वी मनमितसिंग गुरूप्रीतसिंग याचा मृतदेह आढळला.

अमृतसरच्या तरुणाचा मित्रांनीची चिरला गळा; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वासेफ पटेल
भुसावळ - अमृतसर येथील तरुणाचा मित्रांनीच गळा चिरून खून केला. ही धक्कादायक घटना शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उघडकीस आली. या प्रकरणी चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.
मनमितसिंग गुरूप्रीत सिंग (१९, रा.अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनमितसिंग हा आपल्या पाच मित्रांसह बुधवार, २६ रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता. डी- २ डब्यात या पाच तरुणांचा एका प्रवाशासोबत वाद होवून त्यास मारहाणही केली. संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले. गुरुवारी सकाळी मनमितसिंग याचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे सोबतच्या चारही मित्रांनीच हा खून केल्याचा संशय आहे. याबाबत मनमितच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चारही संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करीत चिरला गळा
खंडवा मार्गावरील यार्डात कॉर्ड लाईनवर गुरूवारी सकाळी दहा वाजेपूर्वी मनमितसिंग गुरूप्रीतसिंग याचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे हात, पाय, खांदा हे फ्रॅक्चर झाल्याचे तसेच गळा चिरल्याचे आढळून आले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नंतर मृत मनमितसिंग याच्या भावाने फिर्याद दिली. त्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शखाली पोलिस तपास करीत आहे.
डेबीट कार्डवरून पटली ओळख
मनमितजवळ डेबीट कार्ड होते. ते पंजाब अॅण्ड सिंध बॅंकेचे होते, त्या कार्डावरून पोलिसांनी औरंगाबाद येथील बॅंक शाखेत चौकशी केली. त्यावरुन मृताची ओळख पटली. शुक्रवारी सायंकाळी विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.