कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संशयित अमोल काळे याचा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून त्याचा एसआयटी लवकरच ताबा घेणार आहे. बंगळुरू सीबीआय न्यायालयाने एसआयटीला त्याबाबतची मंजुरी दिल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी दिली.संशयित काळे हा सध्या सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा ताबा मिळावा, यासाठी एसआयटीने बंगळुरूच्या सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे; त्यामुळे लवकरच एसआयटीचे पथक काळेचा ताबा घेणार आहे. चौकशीत अनेक धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती येतील, असेही त्यांनी सांगितले.नालासोपारा परिसरात शरद कळसकर याच्या घरातून पोलिसांनी गावठी बॉम्ब, पिस्तुले, स्फोटके जप्त केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्यांसंबंधी महत्त्वाची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली. पानसरे, दाभोलकर हत्येचा मास्टर मार्इंड संशयित डॉ. विरेंद्रसिंह तावडे असला, तरी अमोल काळे हा कोल्हापुरात वास्तव्याला असताना त्याने पानसरे यांच्या हत्येची रेकी केल्याचा संशय आहे; त्यासाठी त्याने मित्राकडून मागून आणलेल्या दोन काळ्या रंगाच्या दुचाकींचा वापर केला होता. त्या तपास यंत्रणेने जप्त केल्या आहेत; परंतु, त्यांचे मालक अद्याप मिळून आलेले नाहीत. या चारही हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर केला आहे. पानसरे हत्येच्या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केलेल्या चार पुंगळ्या व एक जिवंत काडतूस तसेच लंकेश हत्येतील पुंगळ्या यांच्यातील साधर्म्य तपासण्यास त्या गुजरात-गांधीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या आहेत.
अमोल काळेचा लवकरच ताबा - अभिनव देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:16 IST