गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांत बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे ईमेल पाठवले जात होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अहमदाबाद क्राईम ब्रांच आणि सायबर क्राईम युनिटने मोठी कारवाई केली आहे. या ईमेल्समागील मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. सौरभ बिस्वास असं या आरोपीचं नाव असून त्याला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. अनेक शाळा आणि न्यायालयांना धमकीचे ईमेल पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सौरभ बिस्वास हा या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपासून देशात ठिकठिकाणी धमकीचे ईमेल पाठवून भीतीचे वातावरण निर्माण केलं जात आहे. २ मार्च २०२६ रोजी दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, सरदार पटेल विद्यालय यांसारख्या ६ शाळा आणि अॅक्सिस बँक, एसबीआय (SBI) शाखा यांसारख्या ३ बँकांना धमकीचे ईमेल प्राप्त झाले होते. त्याच दिवशी भोपाळ आणि गोव्यातही असेच ईमेल आले होते. यामध्ये भोपाळचे एम्स (AIIMS), एक विद्यापीठ, जीपीओ (GPO) आणि प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाचा समावेश होता. तर गोव्यातील पासपोर्ट भवनमध्ये ईमेल मिळाल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली होती. याशिवाय हैदराबाद, चंदीगड आणि पंजाबमध्येही अशाच धमक्यांचे ईमेल आले आहेत.
स्पेशल क्राईम युनिटच्या या विशेष मोहिमेअंतर्गत आरोपी सौरभ बिस्वासला पश्चिम बंगालमधून ताब्यात घेण्यात आलं. त्याने अलीकडच्या काळात अनेक शाळा आणि न्यायालयांना ईमेल पाठवून लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. हे संपूर्ण ऑपरेशन पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली राबवण्यात आलं. सहपोलीस आयुक्त शरद सिंघल यांनी संशयिताला पकडण्यासाठी प्लॅन केला होता.
या विशेष ऑपरेशननंतर आरोपी सौरभ बिस्वासला अहमदाबादमध्ये आणण्यात आलं असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. हे ईमेल पाठवण्यामागचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञ त्याची कसून चौकशी करत आहेत. तसेच सुरक्षा प्रोटोकॉलला बगल देऊन त्याने कोणत्या तांत्रिक पद्धतींचा वापर केला, याचाही तपास सायबर तज्ज्ञांकडून केला जात आहे.
Web Summary : Police arrested Sourav Biswas in West Bengal for sending bomb threat emails to schools, courts, and banks across India. He's the alleged mastermind, now in police custody in Ahmedabad, undergoing investigation.
Web Summary : भारत में स्कूलों और बैंकों को बम की धमकी वाले ईमेल भेजने के आरोप में सौरभ बिस्वास को पश्चिम बंगाल में गिरफ्तार किया गया। वह कथित मास्टरमाइंड है और अहमदाबाद में पुलिस हिरासत में है।