Gujarat School Crime:गुजरातच्या अहमदाबादमध्ये १० वीच्या एका विद्यार्थ्याची सातवीतील विद्यार्थ्यांनी केलेल्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. क्षुल्लक वादातून काही विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोकसून हत्या केली. दहावीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या सुमारे २ हजार लोकांच्या जमावाने शाळेला घेराव घालून तोडफोड केली. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता आरोपी विद्यार्थ्याचे इन्स्टाग्राम चॅटिंग समोर आले आहे. चॅटिंगमध्ये विद्यार्थी आपणच चाकू मारल्याचे सांगत आहे.
मंगळवारी अहमदाबादमधील एका खाजगी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याला त्याच्याच शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी वादानंतर चाकूने भोसकून ठार केले, ज्यामुळे बुधवारी पालक आणि स्थानिकांनी गोंधळ घालत तोडफोड केली. त्यानंतर प्राथमिक पोलिस तपासात आरोपी आणि त्याच्या मित्रामध्ये झालेली चॅटिंग समोर आली ज्यामध्ये मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. चॅटिंगमध्ये त्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला का केला याचे कारणही सांगितले.
काही दिवसांपूर्वी या दोन विद्यार्थ्यांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. या जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपीने मंगळवारी लपवून ठेवलेला चाकू घेऊन आला. शाळा सुटताच त्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. जखमी विद्यार्थ्याच्या पोटात गंभीर जखमा होत्या. त्याला मणिनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जीव वाचू शकला नाही. विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समजातच बुधवारी सकाळी सिंधी समाजाचे लोक, बजरंग दल, विहिंप आणि अभाविपचे कार्यकर्ते शाळेत पोहोचले. शाळेत पोहोचताच त्यांनी शाळेबाहेर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शाळेत प्रवेश केला. यावेळी मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली.
आरोपी आणि त्याच्या मित्राची चॅटिंग समोर
मित्र: भावा, आज तू काही केलंस का?
आरोपी: हो.
मित्र: तू कोणाला चाकू मारलास का?
आरोपी: तुला कोणी सांगितलं? आणि कोण होता तो?
मित्र: एक मिनिट फोन कर
आरोपी: नाही, नाही. मी माझ्या भावासोबत आहे. त्याला आज काय झालं हे माहित नाही.
मित्र: तो (पीडित) मेला आहे.
आरोपी: त्याला सांग की मी त्याला मारलं. तो मला ओळखतो, आत्ताच सांग.
मित्र: प्रत्यक्षात काय झालं होतं पण?
आरोपी: अरे, त्याने (पीडित) मला विचारलं की तू कोण आहेस आणि तू काय करणार आहेस?
मित्र: ###### यासाठी तू एखाद्याला चाकूने मारू शकत नाहीस. तू त्याला फक्त मारहाण करू शकला असतास, मारुन टाकायचं नव्हतं.
आरोपी: आता जे झालं ते झालं.
मित्र: स्वतःची काळजी घे. काही काळासाठी गायब हो. या चॅट्स डिलीट कर.
आरोपी: ठीक आहे.
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की,पीडित विद्यार्थ्यावर शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला. पीडित विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. आरोपी विद्यार्थी दुसऱ्या समुदायाचा आहे. त्याच वेळी, मृताचे संतप्त नातेवाईक आणि स्थानिक लोक शाळेच्या आवारात घुसले आणि तोडफोड सुरू केली.