आई वडिलांना 'Good Bye' करून क्लाससाठी घरातून निघाला अन् टेरेसवरून उडी घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:20 IST2022-08-22T17:18:25+5:302022-08-22T17:20:14+5:30
वसईत आयटी विद्यार्थ्याची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या, १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने उचलले आत्महत्येच पाऊल

आई वडिलांना 'Good Bye' करून क्लाससाठी घरातून निघाला अन् टेरेसवरून उडी घेतली
मंगेश कराळे
नालासोपारा - वसंत नगरीच्या सेक्टर दोन मधील एका इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. आनंद के प्रशांत (१७) असे या तरुणाचे नाव असून तो आयटी क्षेत्रात शिक्षण घेत होता. सोमवारी नेहमीप्रमाणे आनंद सकाळी साडे सात वाजता आई वडिलांना 'बाय' करून क्लाससाठी घरातून निघाला होता. मात्र घरातून निघताच तो बिल्डींगच्या टेरेसवर पोहोचला व जीवन संपविण्यासाठी त्याने टेरेसवरून खाली उडी घेतली.
या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. बिल्डींगमध्ये मोठा आवाज झाल्यामुळे हा प्रकार रहिवाशांच्या लक्षात आला, मात्र त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. माणिकपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवून दिला आहे. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली असावी त्याबाबतची अधिक चौकशी पोलीस आता त्याच्या मित्र मंडळींकडे करत आहेत.