बिअर पाजून पत्नीने पतीचा गळा आवळला अन् सर्पदंश दिला; पती बालंबाल बचावला
By अझहर शेख | Updated: January 30, 2024 14:14 IST2024-01-30T14:14:23+5:302024-01-30T14:14:33+5:30
याप्रकरणी पोलिसांनी संशयित सोनी उर्फ एकता जगतापसह तिच्या दोघा अज्ञात साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बिअर पाजून पत्नीने पतीचा गळा आवळला अन् सर्पदंश दिला; पती बालंबाल बचावला
- संदीप झिरवाळ
पंचवटी : आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारण्यासाठी पत्नीने चक्क पतीला बिअर पाजून तोंड उशीने दाबून सर्पदंश देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सोनी उर्फ एकता जगतापसह तिच्या दोघा अज्ञात साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील बोरगड शिवारातील उज्वलनगर परिसरात पाटील दाम्पत्य वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि.२७) संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास संशयित सोनी व तिच्या दोघा साथीदारांनी आपआपसांत कट रचून संगनमताने पती विशाल पोपटराव पाटील (४१) यास बिअर पाजली. यानंतर कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून तोंडावर उशी दाबून धरत साथीदारांच्या मदतीने सर्पदंश दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी संशयित महिला व तीच्या दोघा साथीदारांविरूद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पाटील याची प्रॉपर्टी हडपण्यासाठी तसेच मौजमजा करण्यासाठी या संशयितांनी कट केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सोबत आणलेल्या सापाच्या सहाय्याने बळजबरीने तिघांनी फिर्यादी विशाल यास दंशदेखील दिला. सुदैवाने यामध्ये विशालचा जीव वाचला. हेल्मेटनेसुद्धा मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.