उल्हासनगर : कॅम्प नं-४, दुर्गापाडा परिसरात अल्पवयीन सहकारी मुला सोबत २० पेक्षा जास्त वाहनाची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलवाडी पोलीसानी यातील मुख्य आरोपी सुमित उर्फ लाल सुनील कदम याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-४, दुर्गापाडा परिसरात गणेश विसर्जनाच्या रात्री २० पेक्षा जास्त वाहनाची तोडफोड करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न एका टोळक्याने केला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका टोळक्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टोळक्याचा मोरक्या सुमित उर्फ लाल सुनील कदम याच्यासह ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. सुमित उर्फ लाल सुनील कदम याची पोलिसांनी चौकशी केला असता, त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरपोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गुंड सुमित सुनील कदम यांची गुन्हेगारी पाश्वभूमी पाहता पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये कलमांचा अंतर्भाव करण्याकरिता अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. अपर पोलीस आयुक्तानी मोक्का ऍक्ट अंतर्गत कलमात वाढ करण्याला मान्यता दिली. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सुमित कदम याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.