मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिपलानी परिसरात एका महिलेवर एका व्यक्तीने ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्या गळ्यावर, छातीवर आणि हातावर ॲसिड पडल्यामुळे ती जखमी झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने हा ॲसिड हल्ला केला, त्या व्यक्तीविरुद्ध काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणि तो नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.
भाजी घेण्यासाठी गेली असता केला हल्ला
पीडित महिलेला दोन मुले आहेत आणि तिचा पतीसोबत घटस्फोट झाला आहे. ती आपल्या दोन मुलांसह अवधपुरी येथे राहते आणि केअरटेकर म्हणून काम करते. आरोपीने गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिच्यावर हा हल्ला केला. महिला तिच्या आईसोबत गणेश मंदिराच्या जवळ भाजी घेण्यासाठी निघाली होती. त्याच वेळी आरोपी आपल्या एका साथीदारासोबत दुचाकीवरून आला आणि त्याने महिलेवर ॲसिड फेकले.
पर्स घेण्यासाठी परतत असताना साधली संधी
आरोपीची ओळख आकाश म्हणून पटली आहे. या आकाशविरोधात महिलेने यापूर्वी मिसरोद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणि तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. गुरुवारी सायंकाळी महिला आपल्या आईसोबत घराबाहेर पडली असता, आरोपीने तिला पाहिले. महिला पर्स आणायला विसरली होती आणि आईला सांगून ती पर्स घेण्यासाठी घरी परतत असताना, रस्त्यातच आकाशने तिच्यावर ॲसिड हल्ला केला.
८ महिने 'लिव्ह इन'मध्ये राहिले अन्...
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, आरोपी आकाशचा शोध सुरू केला आहे. आरोपीने हे ॲसिड कुठून विकत घेतले, याचाही पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला आरोपीला पूर्वीपासून ओळखत होती. पतीने घटस्फोट दिल्यानंतर ती आरोपीसोबत सुमारे ८ महिने 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये देखील राहिली होती.
ॲसिड हल्ल्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद
जर कोणी जाणूनबुजून ॲसिड फेकले आणि त्यामुळे पीडितेची प्रकृती गंभीर झाली, तर आरोपीला १० वर्षांची कैद आणि दंड ठोठावला जातो. याव्यतिरिक्त, जर एखाद्या व्यक्तीने ॲसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि पीडितेला गंभीर दुखापत झाली नाही, तर त्याला ५ ते ६ वर्षांची कैद आणि दंड करण्याची कायदेशीर तरतूद आहे.