नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: May 3, 2025 21:31 IST2025-05-03T21:31:23+5:302025-05-03T21:31:44+5:30
लातूर न्यायालयाचा निकाल

नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
राजकुमार जाेंधळे / लातूर : नवविवाहितेच्या खून प्रकरणी दाेषी आरोपीला जन्मठेप आणि १० हजारांचा दंड, अशी शिक्षा लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी सुनावली आहे.
लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ मे २०२३ रोजी कासारगाव येथील सुनील दत्तात्रय घावीट याच्याशी नवविवाहिता (वय १९) हिचे लग्न झाले हाेते. दरम्यान, पाच महिन्यांनी १ ऑक्टाेबर २०२३ रोजी पहाटे ३ वाजता नवविवाहितेचा राहत्या घरी धारदार हत्यारांनी गळ्यावर, तोंडावर वार करून खून करण्यात आला. याची माहिती लातूर ग्रामीण ठाण्याला मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत मयत नवविवाहितेचे वडील प्रभाकर साहेबराव भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. नवविवाहितेला दुचाकी घेण्यासाठी एक लाखाची मागणी करून, वारंवार छळ केला. पती मुख्य आरोपी सुनील दत्तात्रय घावीट (देशमुख) आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, तत्कालीन डीवायएसपी सुनील गोसावी, सुनीलकुमार राऊत, पोनि. दीपककुमार वाघमारे आणि पोनि. अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. भगवान मोरे यांनी तपास केला. आरोपीविरोधात लातूर न्यायालयात दोषारोप दाखल केले. या खटल्यात सरकारी अभियोक्ता संजय मुंदडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. लातूर येथील न्यायालयाने पडताळणी केलेले साक्षीदार आणि सबळ पुराव्याच्या आधारे मुख्य आरोपी सुनील दत्तात्रय घावीट-देशमुख याला २ मे राेजी जन्मठेप आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.