खून का बदला खून...! हत्येच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपी युवकाची हत्या

By सुरेंद्र राऊत | Updated: June 3, 2025 21:20 IST2025-06-03T21:19:55+5:302025-06-03T21:20:17+5:30

खुनाच्या गुन्ह्यात मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी घटनास्थळीच उभी हाेती. या दुचाकीला नंबर प्लेट लावलेली नाही.

Accused acquitted of murder case murdered in Yavatmal | खून का बदला खून...! हत्येच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपी युवकाची हत्या

खून का बदला खून...! हत्येच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपी युवकाची हत्या

सुरेंद्र राऊत

यवतमाळ - वर्षभरापूर्वी कळंब चाैक परिसरात गाेळी झाडून एकाची हत्या झाली हाेती. या गुन्ह्यातील आराेपी पंधरा दिवसांपूर्वी जामीनावर कारागृहातून बाहेर आला. तेव्हापासूनच त्याच्यावर पाळत ठेवून खुनाचा बदल घेण्याचा प्रयत्न सुरू हाेता. मंगळवारी सायंकाळी संधी मिळताच, धारदार शस्त्राने वार करून त्या आराेपीची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे वर्दळीच्या चांदणी चाैक परिसरात खळबळ उडाली.

मनीष सागर शेंद्रे (२५ रा.रमाई पार्क क्र. २ यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. मनीषवर गाेळी झाडून एकाचा खून केल्याचा आराेप आहे. या गुन्ह्यात ताे जानेवारी २०२४ पासून कारागृहात हाेता. काही दिवसांपूर्वी ताे जामिनावर बाहेर आला. त्यावेळी पाेलिसांनी त्याला यवतमाळ शहरात राहू नकाे, तुझ्या जीवाला धाेका आहे, अशी सूचना दिली हाेती. त्यानंतरही मनीष यवतमाळातच फिरत हाेता.

मंगळवारी मनीष त्याची दुचाकी दुरुस्त करण्यासाठी यवतमाळ वनपरिक्षेत्र कार्यालयासमाेर असलेल्या मुन्नाच्या गॅरेजवर आला हाेता. त्याने तेथे दुचाकी दुरुस्तीला टाकली, याची टीप पाळतीवर असलेल्या मारेकऱ्यांना मिळाली. त्यावरून मारेकरी याच परिसरात दबा धरून हाेते. दुचाकी घेण्यासाठी मनीष तेथे पाेहाेचला असता, चाैघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. मनीष शरीरावर अनेक घाव लागूनही त्यांच्या तावडीतून निसटला. मात्र, काही अंतर पुढे जाऊन आरएफओ कार्यालयाच्या फाटकासमाेर काेसळला. त्यानंतर, पुन्हा हल्लेखाेरांपैकी एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून ताे ठार झाला की नाही, याची खात्री केली. नंतर हल्लेखाेर घटनास्थळावरून पसार झाले.

मारेकऱ्यांची दुचाकी लागली हाती

खुनाच्या गुन्ह्यात मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी घटनास्थळीच उभी हाेती. या दुचाकीला नंबर प्लेट लावलेली नाही. मनीषची हत्या केल्यानंतर दुचाकी सुरू झाली नाही. काही अंतर त्यांनी लाेटत नेण्याचा प्रयत्न केला. नंतर तिथेच साेडून दिली. एका ऑटाेरिक्षाने हल्लेखाेर घटनास्थळावरून पसार झाल्याचा संशय आहे.

पाेलिसांची, बघ्यांची एकच गर्दी
खुनाच्या घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली हाेती. मुख्य परिसरातील घटना असल्याने अपर पाेलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ दिनेश बैसाने, एलसीबी प्रमुख सतीश चवरे, शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव, अवधूतवाडी ठाणेदार नरेश रणधीर यांनी घटनास्थळी भेट दिली. फाॅरेन्सिक पथकाने घटनास्थळावर भाैतिक पुराव्यांचा शाेध घेतला, तर दुसरीकडे सर्वच शाेधपथक आराेपींच्या मागावर फिरत हाेते.

Web Title: Accused acquitted of murder case murdered in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.