जयपूर - भारत आदिवासी पार्टीचे आमदार जयकृष्ण पटेल एकेकाळी राजस्थान विधानसभेत भ्रष्टाचाराविरोधात पोस्टर घेऊन आंदोलन करताना दिसत होते. आज तेच आमदार भ्रष्टाचाराच्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. बेकायदेशीर खाणकामासाठी ते खाण माफियांना दोष देत असे, सरकार त्यांना संरक्षण देतेय असा आरोप आमदार सातत्याने करायचे. परंतु त्याच आमदारांना खाण माफियांकडून कोट्यवधीची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. जयकृष्ण पटेल पहिल्यांदा आमदार बनलेत आणि राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आमदाराला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी एसीबीचे पोलीस महासंचालक डॉ. रवी प्रकाश म्हणाले की, आमदार जयकृष्ण पटेल आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे फोन रेकॉर्डवर होते. कॉल रेकॉर्डिंगमध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. रविवारी ४ मे रोजी जेव्हा २० लाखांची लाच देण्यात आली तेव्हा हिडन कॅमेऱ्यात हे सर्व रेकॉर्ड करण्यात आले. जयपूर आमदार निवासाच्या बेसमेंटमध्ये आमदार रोकड मोजत होते, त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ विजय आणि एका व्यक्तीला ती रक्कम दिली. त्यानंतर आमदार पुन्हा त्यांच्या खोलीत गेले. जेव्हा एबीसीचं पथकाने तिथे धाड टाकली तेव्हा रोकड सापडली नाही परंतु जेव्हा आमदाराचे हात धुतले तेव्हा त्यातून नोटांवर लावलेला रंग बाहेर पडला. त्याआधारे आमदाराला अटक करण्यात आली. आमदाराच्या अटकेचे ठोस पुरावे असल्याचं एसीबी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लाच घेतल्यानंतर १४ मिनिटांनी पोहचली पोलीस
सकाळी १०.१६ मिनिटांनी आमदार जयकृष्ण पटेल यांना त्यांच्या वाहनात रोकड प्राप्त झाली. त्यांनी तिथेच नोटांची मोजणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी ही रक्कम त्यांच्या चुलत भावाकडे सुपूर्द केली. विजय आणि एक अन्य व्यक्ती आमदाराकडून नोटांची बॅग घेऊन तिथून निघाले. त्यानंतर आमदार कारमधून खाली उतरत चालत त्यांच्या खोलीकडे गेले. एसीबीचे पथक १०.३० मिनिटांनी आमदाराच्या घरी पोहचले. लाच घेतल्यानंतर १४ मिनिटांनी एसीबीने ही धडक कारवाई केली.
आमदाराविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एसीबीने त्यांचे मोबाईल नंबर ट्रॅक केले होते. त्यावर रेकॉर्डिंग ऐकली असता लाचेच्या रक्कमेचा उल्लेख झाला. एसीबीने हे सर्व रेकॉर्ड केले आहे. रेकॉर्डिंगमध्ये आमदार थेट विधानसभेत प्रश्न लावण्याचा उल्लेख करत धमकी देत असल्याचं ऐकायला मिळाले. १० कोटी नाही दिले अद्दल घडवेन असं आमदाराने म्हटलं. परंतु ही रक्कम खूप जास्त आहे असं म्हटल्यानंतर अडीच कोटीची डील फायनल करण्यात आली. या रक्कमेचा पहिला टप्पा म्हणून २० लाख रोकड रविवारी आमदाराला देण्यात आली. त्यावरच एसीबीने ही कारवाई केली.