उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'सैयारा' चित्रपट पाहिल्यानंतर एका २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आत्महत्या केल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. काही लोक तर चित्रपटगृहातच रडताना किंवा बेशुद्ध पडल्याचंही दिसून आलं आहे.
मेरठमधील प्रकरण नेमकं काय?मेरठ शहरातील लिसाडी गेट भागातील अहमदनगर येथे राहणाऱ्या खालिद यांचा २० वर्षांचा मुलगा शाहबाज याचा नुकताच साखरपुडा झाला होता. तो लवकरच लग्न करणार होता आणि त्यासंबंधीच्या तयारीमध्ये व्यस्त होता. मात्र, मंगळवारी त्याच्या होणाऱ्या सासरहून फोन आला आणि त्यांनी 'आम्ही पुढची ४ ते ५ वर्षे लग्न करणार नाही' असं सांगितलं. यामुळे शाहबाज खूप निराश झाला. त्यानंतर तो त्याच दिवशी रात्री 'सैयारा' या चित्रपटाचा नाइट शो पाहून घरी परतला.
मध्यरात्री घडली घटनाचित्रपट पाहिल्यानंतर तो रात्री आपल्या खोलीत झोपायला गेला. मंगळवारी मध्यरात्री जवळपास ३ वाजता शाहबाजच्या आईला तो खोलीत फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसला. हे पाहून कुटुंबाने एकच आक्रोश केला.
त्यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारचे लोक तिथे जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, कुटुंबीयांनी शाहबाजच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला. पोलिसांना कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनीही ही घटना खरी असून, कुटुंबीयांनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्याची माहिती दिली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.