माथेफिरू युवकाचं संतापजनक कृत्य; भावी पत्नीवरच बलात्कार करून ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 05:33 IST2023-02-19T05:31:06+5:302023-02-19T05:33:12+5:30

कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.

A young man raped and killed his future wife in Jalna | माथेफिरू युवकाचं संतापजनक कृत्य; भावी पत्नीवरच बलात्कार करून ठार केले

माथेफिरू युवकाचं संतापजनक कृत्य; भावी पत्नीवरच बलात्कार करून ठार केले

जालना - लग्न अवघे एका महिन्यावर आलेले असतानाच एका तरुणाने आपल्या होणाऱ्या  पत्नीचा बलात्कार करत गळा चिरून खून केला. मंठा तालुक्यातील बेलोरा गावात शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दीप्ती उर्फ सपना संदीप जाधव (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर खून करणारा तरुण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खुनाचे नेमेक कारण अद्याप समोर आलेले नाही.

बेलोरा गावातील दीप्ती उर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील सुभाष पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. येत्या १७ मार्च २०२३ रोजी विवाह असल्याने शनिवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. यावेळी  सुशीलही बस्त्यासाठी नातेवाइकांसोबत आला होता. मात्र, तो अचानक गायब झाला. त्याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. घटनास्थळी गावातील लोक जमा होताच सुशील फरार झाला. या माथेफिरूने नेमके टोकाचे पाऊल उचलून होणाऱ्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या भावी पत्नीचा खून का केला हे अद्याप समोर आलेले  नाही. 

शेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
 माहिती मिळताच परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, सेवली ठाण्याचे सहायक निरीक्षक नित्यानंद उबाळे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. घटनास्थळी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मारेकरी सुशील पवार यास अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने संशयित तरुणाच्या आईवडिलांसह नातेवाइकांना बेलोरा येथील एका घरात कोंडले आहे. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A young man raped and killed his future wife in Jalna