राजस्थानमधील महाराजाकडून कर्ज घेऊन देतो सांगणारा महाठग अडकला; निघाला अंबरनाथचा लुटारू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 22:48 IST2022-09-22T22:48:23+5:302022-09-22T22:48:40+5:30
, मुंबई शहरामध्ये काही जण ज्यांना बँका लोन देत नाही किंवा त्यांचे खाते एन पी ए झालेले आहे अशा व्यवसायीकांना एजंट मार्फत शोधले जात होते.

राजस्थानमधील महाराजाकडून कर्ज घेऊन देतो सांगणारा महाठग अडकला; निघाला अंबरनाथचा लुटारू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जाची आवश्यकता असलेल्याना हेरायचे. सावज जाळ्यात अडकताच राजस्थान मधील महाराजाकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने बेड्या ठोकल्या आहेत. शाम अर्जनदास तलरेजा (३८), हितेश नारायणदास पुरसनानी (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कक्ष ११ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीत, मुंबई शहरामध्ये काही जण ज्यांना बँका लोन देत नाही किंवा त्यांचे खाते एन पी ए झालेले आहे अशा व्यवसायीकांना एजंट मार्फत शोधुन त्यांना राजस्थान मधील कथीत राजे महाराजे यांचेकडील कोट्यवधी रुपये कर्ज स्वरूपात देण्याचे आमिष दाखवायचे. पुढे, विविध क्षुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक करत असल्याचे समजले.
त्यानुसार, या टोळीच्या जाळ्यात अडकलेल्यांचा शोध घेत चौकशी सुरु केली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करत, उल्हासनगर व अंबरनाथ येथून दोघांना अटक केली. अटक आरोपींच्या चौकशीत पाहिजे आरोपी दिपक सौदा हा कधी बँकेचा अधिकारी कधी राजस्थान मधील कथीत राजा महाराजा तर कधी मोठा शासकीय अधिकारी असल्याचे भासवून जाळ्यात अडकलेल्यांशी संवाद साधत असल्याचे समोर आले. त्याचा शोध सुरु आहे. अटक आरोपीना २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच अशाप्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.