बुलंदशहर - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एका छोट्या किराणा मालाच्या दुकानदाराला जीएसटी विभागाने नोटीस पाठवली आहे. या नोटिशीतील आकडा पाहून दुकानदाराला मोठा धक्का बसला. ही नोटीस तब्बल १४१ कोटींची आहे. दिल्लीतील ६ कंपन्यांमध्ये त्यांच्या पॅनकार्डचा वापर केला गेला. त्यातूनच ही कारवाई दुकानदारावर करण्यात आल्याचं समोर आले.
खुर्जाच्या नयागंज परिसरात राहणाऱ्या सुधीरने सांगितले की, मी माझ्या घरातच छोटेसे किराणा मालाचे दुकान चालवतो. मला पहिल्यांदा २०२२ साली नोटीस आली होती तेव्हा मला अधिकाऱ्यांनी बोलावले तेव्हा माझा या कंपन्यांशी कुठलाही संबंध नाही असं मी सांगितले. त्यानंतर पुन्हा यावर्षी १० जुलैला मला आणखी एक नोटीस मिळाली. ज्यात मी १४१ कोटींचा व्यवहार केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मी हैराण झालो आहे. माझ्या पॅन कार्डचा वापर दिल्लीत कंपन्या उभारण्यासाठी केला आहे असा आरोप त्यांनी केला.
तर सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पॅन कार्ड वापरून फसवणूक झाल्याचा आरोप आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून पॅनकार्ड बँकेत खाते उघडण्यासाठी घेतले जाते, त्यातून बनावट कंपन्या बनवल्या जातात. कर्ज घेतली जातात आणि कर चोरीसाठी याचा वापर केला जातो. सुधीर यांनी केलेल्या आरोपावरून आम्ही चौकशी सुरू केली आहे असं पोलीस अधिकारी पंकज राय यांनी म्हटलं.
दरम्यान, अनपेक्षित कर नोटीस किंवा वसुलीचे कॉल आल्यानंतरच बळींना अनेकदा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. धोका कमी करण्यासाठी तज्ञ नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट तपासण्याची आणि पॅनला आधारशी जोडण्याची शिफारस करतात.