इमारतीत जाण्यास अडवल्याच्या रागात सुरक्षा सुपरवायझरची हत्या
By मनीषा म्हात्रे | Updated: August 30, 2024 22:33 IST2024-08-30T22:32:23+5:302024-08-30T22:33:09+5:30
जिम ट्रेनरला अटक, भांडुपच्या ड्रीम्स सोसायटीतील घटना

इमारतीत जाण्यास अडवल्याच्या रागात सुरक्षा सुपरवायझरची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इमारतीत जाण्यास अडविल्याच्या रागात जिम ट्रेनरने सुरक्षा सुपरवायझरची डोके आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना भांडुपच्या ड्रीम्स सोसायटीत घडली. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी जिम ट्रेनर विशाल गावडेला अटक केली आहे. तो गाढव नाका परिसरात राहतो.
या हल्ल्यात शिवाजी बारवे (६०) यांचा मृत्यू झाला आहे. बारवे हे पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत भांडुपच्या टेंभीपाडामध्ये राहण्यास होते. गेल्या पाच वर्षापासून भांडुप पश्चिमेच्या ड्रीम्स सोसायटीत सुरक्षा सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. २७ ऑगस्ट रोजी ते नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीसाठी गेले. गावडे हा लॉकडाऊनचा पूर्वी या इमारतीत ट्रेनर म्हणून काम करत होता. २७ तारखेला दारूच्या नशेत इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठे जायचे? याबाबत विचारताच त्याने काही माहिती न देता आत जाण्याचा प्रयत्न केला. तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला हटकल्याने वाद घालण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी बारवे यांना याबाबत सांगून बोलावून घेतले. बारवे यांनी गेटवर धाव घेत गावडेला अडवले. याच रागात त्याने बारवे यांना पकडुन त्यांचे डोके कठडयावर आपटले. त्यांच्या अन्य सहकाऱ्यानी मध्यस्थी घेत भांडण सोडवले. आरोपीला पकडून, बारवे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची वर्दी मिळताच भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. बारवे यांना पुढील उपचारासाठी के.इ.एम. रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या डोक्याला सात टाके बसले. तसेच मणक्याला गंभीर दुखापत झाली. आरोपीला गंभीर दुखापतीचा गुन्ह्यात अटक करत त्याची टेबल जामिनावर सुटका करण्यात आली.
उपचारादरम्यान बारवे यांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा कलमाचा समावेश करत आरोपीला पुन्हा अटक केली आहे.
आरोपी दारूच्या नशेत...
आरोपी पूर्वी ड्रीम्स सोसायटीत जिम ट्रेनर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर दुसरीकडे कामाला आहे. घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत आधीच्या कामाच्या ठिकाणी काय चालले आहे? हे पाहण्यासाठी त्याने इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला अडविल्याच्या रागात हल्ला केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अटकेची कारवाई करत न्यायालयाने त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली.
रक्ताच्या थारोळ्यात असताना वडिलांचा कॉल...
हल्ल्यानंतर वडिलांचा कॉल येताच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजले. पोलिसांनी हल्ल्यानंतर आरोपीला किरकोळ दुखापतीचे कलम लावून टेबल जामिनावर सोडून दिले. माझे बाबा गेल्यानंतर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात येताच हत्येचा कलमाचा समावेश केला. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
- निलेश बारवे, शिवाजी बारवे यांचा मुलगा