पुण्याच्या तरुणीला सोलापुरातून कारमधून जबरदस्तीनं पळवून नेले; लग्नकार्यासाठी आली होती
By विलास जळकोटकर | Updated: January 23, 2024 17:53 IST2024-01-23T17:53:22+5:302024-01-23T17:53:53+5:30
नातलगाच्या चेहऱ्यावर मारला स्प्रे

पुण्याच्या तरुणीला सोलापुरातून कारमधून जबरदस्तीनं पळवून नेले; लग्नकार्यासाठी आली होती
सोलापूर : पुण्यातून सोलापुरात लग्नकार्यासाठी आईसमवेत आलेल्या तरुणीला तिच्या मावशीच्या हातातून हिसकावून कारमध्ये जबरदस्तीनं पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार शहरातील विजापूर रोड परिसरातील एका नगरात घडला. सदर तरुणीला ताब्यात घेण्यासाठी संबधितांनी तिच्या मावशीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारल्याचे पिडित तरुणीच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला गेला.
या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी ओमकार पासलकर (रा. कोथरुड, पुणे) व त्याच्या दोन साथीदाराविरुद्ध भा. दं. वि. ३६६ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी या पुणे येथे वास्तव्यास आहे. लग्नकार्यासाठी त्या विजापूर रोड परिसरातील नातलगाच्या घरी आले होते. लग्न २१ जानेवारी रोजी पार पडल्यानंतर लग्नकार्यायाच्या ठिकाणाहून फिर्यादी व त्यांची पिडित तरुणी हे नातलगाकडे रिक्षातून आले असता २२ जानेवारीच्या रात्री ७:३० च्या सुमारास एम एच. १२ पासिंगची पांढरी कार फिर्यादी बसलेल्या रिक्षाजवळ आली.
आतून उतरलेल्या एकानं पिडित तरुणीच्या नातलगाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि जबरदस्तीने सदर तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.