रस्ता बनवण्यास विरोध करत भूमापकाला केली मारहाण, नऊ जणांवर गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Updated: July 15, 2023 15:19 IST2023-07-15T15:19:21+5:302023-07-15T15:19:32+5:30
ही घटना जवाहर नगर येथे घडली.

रस्ता बनवण्यास विरोध करत भूमापकाला केली मारहाण, नऊ जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडून भुमापकाला मारहाण करत कामगारांना हुसकवत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जवाहर नगर येथे घडली. याप्रकरणी रामकृष्ण सावरय्या कोमल्लू (वय ५०, रा. कल्याण नगर भाग २) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत पाथरूट चौक ते गेट्याल चौक येथे डांबरी रोडचे काम सुरू होते. तेव्हा आरोपींनी वर्गणी स्वरूपात खंडणी मागून ते काम बंद पाडले. त्यानंतर आरोपींनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगत होते. यामुळे फिर्यादी यांनी तुम्ही याबाबत नगर अभियंताकडे तक्रार करा असे सांगितले. तेव्हा फिर्यादीस ते काम बंद करण्यास सांगून कामगारांना हुसकावून लावले. यामुळे फिर्यादी हे १३ जुलै रोजी आरोपींना समजून सांगत असताना आरोपींनी त्यांच्या हातातील संबंधित कामाचे असणारे कागदपत्रे, डायरी, मोबाईल हिसकावून घेऊन फेकून देत, त्यांना मारहाण करून दमदाटी केली.
तसेच, कंत्राटदार यांना खंडणी मागून फिर्यादी यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शांतीलाल साबळे, गणेश शिंदे यांच्यासह पाच ते सात अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.