छत्तीसगडहून १५ लाखांचा गांजा घेऊन आलेली कार पकडली, अतिदुर्गम असरअल्लीत पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2023 17:10 IST2023-07-23T17:10:20+5:302023-07-23T17:10:55+5:30
कारची झडती घेतली असता डिकीत ३६ बॉक्समध्ये सुमारे १५ लाख रुपये किंमतीचा तब्बल दीड क्विंटल गांजा आढळून आला.

छत्तीसगडहून १५ लाखांचा गांजा घेऊन आलेली कार पकडली, अतिदुर्गम असरअल्लीत पोलिसांची कारवाई
- कौसर खान
सिरोंचा : छत्तीसगडमधून गांजा घेऊन आलेली कार तालुक्यातील अतिदुर्गम असरअल्ली येथे पोलिसांनी सापळा रचून पकडली. यावेळी चालकाने कार दूर उभी करुन धूम ठोकली तर एक पुरुष व एक महिला अशा दोन परप्रांतीयांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. ही कारवाई २३ जुलै रोजी करण्यात आली. शिव विलास नामदेव व ज्योती सत्येंद्र वर्मा (दोघे रा.उत्तरप्रदेश) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत, तर चालकाचा शोध सुरु आहे.
छत्तीसगड येथून कारमधून (एमएच ३४ एएम- ५५०१) असरअल्ली येथे गांजा येत असल्याची माहिती असरअल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, असरअल्ली- पातागुडम रस्त्यावरील वनविभागाच्या नाक्याजवळ पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांना पाहून चालकाने कार उभी करुन धूम ठोकली.पाठोपाठ शिव नामदेव व ज्योती वर्मा यांनीही कार सोडून पलायनाचा प्रयत्न केला, परंतु त्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख , उपअधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश गावडे, अंमलदार जगन्नाथ कारभारी, दिलीप उडके, शंकर सलगर, आदिनाथ फड यांनी ही कारवाई केली आहे.
डिकीत दीड क्विंटल माल
कारची झडती घेतली असता डिकीत ३६ बॉक्समध्ये सुमारे १५ लाख रुपये किंमतीचा तब्बल दीड क्विंटल गांजा आढळून आला. कारसह एकूण २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी सुरु आहे.