मिटरसाठी मागितली साडे सात हजारांची लाच; महावितरणच्या तंत्रज्ञाला एसीबीचा 'झटका'
By सोमनाथ खताळ | Updated: August 1, 2023 23:37 IST2023-08-01T23:37:15+5:302023-08-01T23:37:31+5:30
बाळासाहेब श्रीरंग मोटे (वय ४३) असे लाचखोर तंत्रज्ञाचे नाव आहे.

मिटरसाठी मागितली साडे सात हजारांची लाच; महावितरणच्या तंत्रज्ञाला एसीबीचा 'झटका'
बीड : पेट्रोल पंपासाठी लाईट कोटेशन भरुन नवीन मीटर बसवून देण्यासाठी महावितरणच्या तंत्रज्ञाने ७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी बीड एसीबीने मंगळवारी कारवाई करत लाचखोर तंत्राज्ञावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
बाळासाहेब श्रीरंग मोटे (वय ४३) असे लाचखोर तंत्रज्ञाचे नाव आहे. तो धर्मापुरी कार्यालयात कार्यरत आहे. मोटेने तक्रारदार यांच्या आईचे नावावर असलेल्या पेट्रोल पंपाकरीता इलेक्ट्रिक लाईट कनेक्शन घेण्यासाठी कोटेशन भरुन नवीन इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्यासाठी कोटेशन रकमेव्यतिरिक्त स्वतःसाठी पंचासमक्ष ७ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली.
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस, अंमलदार सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.