एका ५२ वर्षीय विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची घटनाच समोर आली आहे. ११ ऑगस्ट रोजी महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला होता. महिलेचे नाव राणी असून, ती उत्तर प्रदेशातील फरुखाबादची असल्याचे तपासातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात तिची हत्या २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडने केल्याचे उघड झाले.
राणी आणि अरुणची इन्स्टाग्रामवर झाली भेट
पोलिसांनी सांगितले की, अरुण राजपूत आणि राणी हे वर्ष-दीड वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर भेटले होते. राणी वय लपवण्यासाठी फिल्टर वापरून फोटो टाकत होती. अरुण राजपूतला वाटलं की, तिचं वय खूपच कमी आहे.
त्यांच्या ऑनलाईन चॅटिंग सुरू झाली. त्यानंतर ते रिलेशनमध्ये आले. ते एक-दोन वेळा फरुखाबादमधील हॉटेलमध्येही भेटले होते. राणीला चार मुलं आहेत आणि तिने दीड लाख रुपये अरुणला दिले होते.
अरुणने राणीची हत्या का केली?
पोलीस चौकशीत अरुणने त्यांच्यात काय बिनसलं याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, काही काळ गेल्यानंतर राणीने अरुणकडे लग्न करण्याची मागणी केली. ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणू लागली आणि पैसेही परत मागायला लागली.
१० ऑगस्ट रोजी अरुणने तिला मैनपुरीला बोलावून घेतलं. तिथे ते भेटले. राणीने पुन्हा लग्न करण्याचा मुद्दा काढला आणि पैसे परत मागितले. त्यानंतर आरोपी अरुणने तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला होता.
राणीची ओळख कशी पटली?
राणी बेवारस मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी ओळख पटवण्याचे काम सुरू केले. उत्तर प्रदेशातील जवळपासच्या सगळ्या पोलीस ठाण्यात राणीचा फोटो पाठवण्यात आला. त्यातच राणी बेपत्ता असल्याची तक्रार फरुखाबाद पोलीस ठाण्यात नोंदवली गेलेली असल्याचे समोर आले आणि राणीची ओळख पटली.
अरुण राजपूतने पोलिसांना सांगितले की, मी जर तिला लग्न करण्यास नकार दिला असता, तर ती पोलीस किंवा माझ्या घरच्यांपर्यंत पोहोचली असती.
पोलिसांनी अरुणकडील दोन्ही फोन जप्त केले आहेत. त्यात फोटो आणि दोघांमध्ये झालेला संवाद आहे. अरुणला अटक करण्यात आल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आले.