मुंबई- मंगळवारी रात्री एमआयडीसी येथील घरी एका २३ वर्षीय तरुणाने त्याच्या ५० वर्षीय वडील आणि ७५ वर्षीय आजोबांची निर्घृण हत्या केली. त्याने त्याच्या काकांवरही चाकूने हल्ला केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. नंतर, आरोपीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
चेतन भत्रे असे आरोपीचे नाव असून तो अंधेरी पूर्वेतील तक्षशिला बिल्डिंगमध्ये राहतो. त्याचे वडील मनोज (५०) आणि आजोबा बाबू भत्रे (७५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, वडील आणि आजोबा रोज रात्री घरी दारू पिऊन एकमेकांशी भांडायचे. त्यामुळे चेतन नाराज होता. तो आणि त्याची बहीण दोघेच कुटुंबाचा आधार होते.
मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चेतन त्याच्या कुटुंबासह घरी असताना त्याचे वडील मनोज आणि आजोबा बाबू पुन्हा भांडू लागले. भांडण वाढल्याने चेतनचा राग अनावर झाला आणि त्याने स्वयंपाकघरातून चाकू उचलून वडील मनोज यांची गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर आजोबा बाबू यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही गळ्यावर चाकू फिरवून मनोजने त्यांची हत्या केली. याचदरम्यान, त्याचे काका अनिल यांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेतनने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. मात्र, अनिल पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली.
आम्ही याप्रकरणी चेतनविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे जखमी काका अनिल यांच्यावर नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. - दत्ता नलावडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १०