Raigad Crime: माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या पोटच्या सहा वर्षांच्या चिमुरडीची तिच्याच जन्मदात्या आईने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलगी नीट बोलत नाही या कारणावरून सतत नैराश्यात असलेल्या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील 'गुरुसंकल्प हाउसिंग सोसायटी'मध्ये हे कुटुंब वास्तव्यास होते. आरोपी महिला (३० वर्ष) आणि तिचे पती, जे एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर आहेत, यांचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. २०१९ मध्ये त्यांना मुलगी झाली. मात्र, या चिमुरडीला लहानपणापासूनच बोलण्यात समस्या येत होत्या. ती प्रामुख्याने मराठीऐवजी हिंदीत बोलायची.
मुलीच्या या भाषिक अडचणीमुळे आई प्रचंड तणावाखाली होती. "मुलगी नीट बोलत नाही, तिला घरात ठेवू नये," असे ती वारंवार पतीला सांगायची. पतीने तिला अनेकदा समजावून सांगण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या मनातील राग कमी झाला नाही.
'त्या' रात्री काय घडलं?
२३ डिसेंबरच्या रात्री हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. त्याच दिवशी मुलीची आजी तिला भेटण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी आली होती, पण त्यांची भेट होऊ शकली नाही. रात्री पती घरी परतल्यावर मुलगी कोणतीही हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता.
पोलिसांचा संशय आणि गुढ उकले
वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र कोटे यांना मुलीच्या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी तातडीने शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. प्राथमिक अहवालात मुलीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांची कसून चौकशी सुरू केली. सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर, अखेर आईने आपला गुन्हा कबूल केला. तिनेच आपल्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.
मानसिक आजाराचे उपचार सुरू
तपासादरम्यान पोलीस प्रशासनाला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपी महिला घटनेच्या वेळी मानसिक आजारावर उपचार घेत होती. या नैराश्यातूनच तिने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रायगड पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Raigad, a mother tragically murdered her six-year-old daughter due to the child's preference for speaking Hindi over Marathi, driven by frustration and mental health issues.
Web Summary : रायगढ़ में, एक माँ ने अपनी छह साल की बेटी की हत्या कर दी क्योंकि बच्ची मराठी की तुलना में हिंदी बोलना पसंद करती थी, जो निराशा और मानसिक स्वास्थ्य समस्याओं से प्रेरित थी।