कल्याणमधील मराठी तरुणावरील हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीसह ६ जणांना पोलीस कोठडी
By मुरलीधर भवार | Updated: December 21, 2024 17:19 IST2024-12-21T17:18:23+5:302024-12-21T17:19:17+5:30
अभिजीत देशमुख यांच्यासह अन्य दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला हाेता.

कल्याणमधील मराठी तरुणावरील हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीसह ६ जणांना पोलीस कोठडी
कल्याण : कल्याणमधील अजमेरा हाईटस इमारतीतील मराठी तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याने मुख्य आराेपी अखिलेश शुक्ला याच्यासह सहा आरोपींना खडकपाडा पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी हजर केले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अभिजीत देशमुख यांच्यासह अन्य दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला हाेता. धूप जाळण्यावरुन वाद झाला होता. सोसायटीतील रहिवासी अखिलेश शुक्ला याने बाहेरुन काही तरुणांना बोलावून देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी देशमुख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी रंगा उर्फ दर्शन बोराडे आणि सुमीत जाधव यांना प्रथम अटक केली. त्यानंतर प्रमुख आरोपी शुक्ला याला अटक करण्यात आली होती.
या तिघांच्या अटकेपाठोपाठ शुक्ला यांची पत्नी गीता हिच्यासह विवेक जाधव आणि पार्थ जाधव या तिघांना पोलिसांनी अटक केली. या सहाही आरोपींना शनिवारी कल्याण न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर सहा जणांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.