कंपनीच्या ३५० कामगारांचे झाले बोगस लसीकरण; लोन आता नवी मुंबईतही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 13:07 IST2021-07-03T13:06:48+5:302021-07-03T13:07:27+5:30
शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीत हे बनावट लसीकरण झाले आहे. कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरण भरवण्यात आले होते.

कंपनीच्या ३५० कामगारांचे झाले बोगस लसीकरण; लोन आता नवी मुंबईतही
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : शिरवणे एमआयडीसी येथील कंपनीत लसीकरण दरम्यान कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट लसीकरण करून संबंधितांनी कंपनीकडून ४ लाख २४ हजार रुपये उकळले होते. (Fake vaccination in Atomberg technology at Shiravane Midc)
शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीत हे बनावट लसीकरण झाले आहे. कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरण भरवण्यात आले होते. या लसीकरणाची जबाबदारी केईसीपी हेल्थ केयर हॉस्पिटलवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार डॉ. मनीष त्रिपाठी यांनी त्यांचे पथक त्याठिकाणी पाठवले होते. २३ एप्रिलला हे शिबीर भरवले असता त्यावेळी कंपनीतल्या ३५० कामगारांचे लसीकरण करून ४ लाख २४ हजार रुपये उकलण्यात आले होते. याशिवाय लसीकरण केल्याचे त्यांना बनावट प्रमाणपत्र देखील देण्यात आले होते. मात्र काही कामगार दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता, त्यांना पहिल्या डोस घेतल्याचे देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.
त्यानुसार कंपनीतर्फे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड, उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्यामार्फत तपास सुरु होता. यामध्ये कंपनीच्या ३५० कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार शुक्रवारी रात्री तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.