लग्नाच्या आमिषाने ३५ तरुणींना गंडा; कल्याणमधील ठकसेनाला अटक, क्राईम ब्रँचची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:16 AM2022-01-19T05:16:03+5:302022-01-19T05:17:53+5:30

गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-७च्या पथकाने त्याला शिताफीने अटक केले आहे

35 young women were lured by the pretext of marriage | लग्नाच्या आमिषाने ३५ तरुणींना गंडा; कल्याणमधील ठकसेनाला अटक, क्राईम ब्रँचची कारवाई

लग्नाच्या आमिषाने ३५ तरुणींना गंडा; कल्याणमधील ठकसेनाला अटक, क्राईम ब्रँचची कारवाई

Next

मुंबई : सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल बनवून एका उच्चशिक्षित  ठकसेनाने तब्बल ३५  तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशाल सुरेश चव्हाण ऊर्फ अनुराग चव्हाण (३०) असे या भामट्याचे नाव असून लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-७च्या पथकाने त्याला शिताफीने अटक केले आहे.

 चव्हाणने  बी टेक व एमबीएची पदवी घेतली आहे. माहिती तंत्रज्ञानातील कौशल्याच्या आधारे त्याने  इन्स्ट्राग्राम फेसबुक, जीवनसाथी आदी वेबसाईटवर वेगवेगळी प्रोफाइल बनवून श्रीमंत आणि उद्योगपती  असल्याचे भासवत गेल्या काही वर्षांपासून हा उद्योग सुरू ठेवला होता. ओळख पटू नये, यासाठी तो वेगवेगळे मोबाईल वापरत होता. त्याचे एसडीआरमध्ये खोटे पत्ते नोंदविले होते.

कांजुरमार्ग परिसरातील एका २८ वर्षाच्या तरुणीशी लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून अनुरागने नोव्हेंबरमध्ये जवळीक वाढवली. त्यानंतर एका व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहण्याने  अभुदय बँकेतील खात्यावर अडीच लाख भरण्यास सांगितले. त्यानंतर तो तिला टाळू लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली. याबाबत क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. 

वेगवेगळ्या ॲप्स, साईटची तपासणी करून  त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. त्याच्याबाबत  माहिती मिळविल्यानंतरही तो महिनाभर पोलिसांना चकवा देत होता. अखेर कल्याणमधील  श्रद्धा महल येथील एका फ्लॅटमध्ये लपून राहिला होता. फ्लॅट बंद असल्याचे भासवण्यासाठी त्याने   बाहेरून लॉक लावले होते. मात्र पोलिसांनी कौशल्याने त्याचा छडा लावला.

पोलीस अधिकारी बनला डिलिव्हरी बॉय
अनुरागला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी एका हॉटेलचा डिलिव्हरी बॉय बनले. त्यासाठी आरोपीने ऑर्डर दिलेले पार्सल घेऊन त्या ते फ्लॅटमध्ये गेले. पार्सल घेण्यासाठी तो बाहेर आल्यानंतर त्याला पकडले.

अनुराग, विशाल नाव वापरून त्याने ३५ मुलींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यांना व्यवसायात भागीदार, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने जवळपास २० लाख रुपये उकळले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे लेटेस्ट आयफोन मिळवून देण्याचा बहाण्याने सुमारे २५ लाखाला गंडा घातला असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

Web Title: 35 young women were lured by the pretext of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app